By  
on  

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला मिळतोय प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

स्टार प्रवाह वाहिनीवर बुद्धपौर्णिमेपासून सुरु झालेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. महामानवाची गौरवगाथा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच कमालीची उत्सुकता होती आणि याच उत्साहात रसिक प्रेक्षकांनी या मालिकेचं उत्साहात स्वागत केलं. महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी ही मालिका एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.

काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत या मालिकेचं प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केलं. स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरुनही प्रेक्षकांनी या मालिकेविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया दिलखुलासपणे कळवल्या आहेत. या मालिकेच्या निमित्ताने घराघरात बाबासाहेबांचे विचार पोहोचत आहेत, पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय, खूप शिकायला मिळतंय, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहेत.

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा उलगडण्यात आलं आहे. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महामानव होण्यापर्यंतचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात येतोय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही,स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे. अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत असून बाबासाहेबांच्या पत्नी अर्थात रमाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारतेय. नितीन वैद्य यांच्या 'दशमी प्रोडक्शन'ने या मालिकेची निर्मिती केली असून अजय मयेकर या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडत आहेत.

खूप काही शिकण्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी महामानवाची गौरवगाथा सर्वांनी न चुकता पाहावी. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’  ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive