By  
on  

छोट्या आंबेडकरांची भूमिका साकारणाऱ्या अमृत गायकवाडविषयी जाणून घ्या

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा...' या मालिकेत बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका बालकलाकार अमृत गायकवाड साकारत आहे. छोट्या अमृतवर सध्या सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमृत मुळचा नाशिकजवळच्या घोटी गावात राहणारा. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती हे जेव्हा अमृतला कळालं तेव्हा त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा सर्वांच्या नजरेत भरला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी निवड झाली.

अमृत सेटवर सर्वांचाच लाडका आहे. दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सुचनांचं तो तंतोतंत पालन करतो. त्यामुळेच सीन अधिकाधिक खुलून येतात. मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचं नातं अधिक घट्ट आहे. आनंदाशिवाय एक क्षणही त्याला चैन पडत नाही. या दोघांची ही केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षकगीतही अमृतने तोंडपाठ केलं आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनयाचं वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

अमृत साकारत असलेल्या छोट्या भीमरावांची गोष्ट प्रेक्षकांना स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत पाहायला मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive