सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि एक नवीन इतिहास रचला. मराठी सिनेमासुध्दा 100 कोटी क्लबमध्ये जाऊ शकतो हे सैराटने सिध्द करुन दाखवलं. याचं संपूर्ण श्रेय जातं लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळेला. आज 24 ऑगस्ट हा त्याचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त खास नागराज मंजुळेच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.
सोलापूरच्या एका छोट्या गावातून आपल्या सशक्त व प्रतिभावान लेखणीतून आणि दिग्दर्शनातून नागराजने सिनेसृष्टीत स्वत:चं एक वलय निर्माण केलं. वास्तव पडद्यावर अचूक मांडणं ही त्याची खासियत. पिस्तुल्या या त्याच्या पहिल्या लघुपटाचं सिनेरसिकांनी प्रचंड कौतुक केलं. तर फॅण्ड्रीमधून समाजातलं धगधगतं वास्तव समोर आलं. सैराटबद्दल काय बोलणार मराठीच नाही तर संपूर्ण बॉलिवूडसुध्दा झिंगाट झालं. सैराटने यशाचे अनेक विक्रम केले. म्हणूनच तर बॉलिवूडकरांनासुध्दा त्याचा हिंदी रिमेक करण्याचा मोह आवरता आला नाही. निर्माता करण जोहरने सैराटचा हिंदी रिमेक धडक बनवला.
महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनीसुध्दा नागराजसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली. हा त्याच्या कार्याचा पुरस्कारांपेक्षाही मोठा गौरव ठरला. नागराज फक्त लेखक-दिग्दर्शकच नाही तर एक कवीसुध्दा आहे. त्यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रियतेची व्याख्या बदलणा-या या सैराट दिग्दर्शकाला मराठी पिपींगमूनतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!