बॉलिवूडमधील सुंदर आणि गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरशी झुंज देत असल्याचे आपण सर्वच जाणतो.आपल्या उपचाराविषयी,तिच्या आजारपणातील दिनक्रमाविषयी ती नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही ना काही अपडेट्स सतत देताना पाहायला मिळते. सोनालीने आपल्या केसविरहित नवीन लुक्सचे फोटो आणि फोटो कोलाजचा एक व्हिडीओ शेअर करत एक हद्यस्पर्शी पोस्ट केली आहे.
धीट सोनालीने शेअर केला फोटो, या रुपातही दिसतेय सुंदर
आयुष्यात आलेल्या या कठीण प्रसंगाला सोनाली धैर्याने आणि हसतमुखपणे सामोरी जात असल्याचे आपण पाहत आलो आहोत. सोनालीने तिच्या नवीन लुक्सच्या कोलाजचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, “वॅनिटी इज माय ऑल टाईम फेव्हरिट सीन. सुंदर दिसणं कोणाला आवडणार नाही? आपण जसे दिसतो तसाच मानसिकदृष्ट्या प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडतो. तुम्ही कशामुळे आनंदी होता हेसुध्दा तितंकच महत्त्वाचं आहे. जर कोणाला विग घालायचाय, कोणाला गडद लाल रंगाची लिपस्टिक लावायची किंवा कोणाला उंच टाचाच्या चपला घालायच्या आहेत. तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट हे कोणीच सांगू शकत नाही. ते फक्त तुम्हीच ठरवू शकता. जेव्हा मी स्वत:साठी विग टेस्ट करत होती, तेव्हा एक प्रश्न मनात तरळला. मनोरंजन विश्वाचा भाग आहे, म्हणून मला छान दिसावसं वाटतंय का? पण नंतर मला जाणवलं मला माझ्यासाठी छान दिसावसं वाटतंय. जर मला स्कार्फ घालून फिरायचं किंवा स्कार्फशिवाय मनोसोक्त फिरायचंय हे सर्वस्वी माझ्या मनावर अवलंबून आहे. तुम्हाला जे आवडतंय. छान वाटतंय ते तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला ज्यामुळे चांगली भावना निर्माण होते ते फक्त तुम्हीच योग्यप्रकारे जाणू शकता.” महत्त्वाचं म्हणजे विगसाठी हेअरस्टाईलिस्ट सुचविल्याबद्दल सोनालीने या पोस्टमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राचे आवर्जून आभार मानले आहेत.
https://www.instagram.com/p/BnVYAYAFNgc/?taken-by=iamsonalibendre
मागील काही महिन्यांपासून सोनाली न्यूयॉर्क येथे उपचार घेत आहे. तिचे पती गोल्डी बहलसुध्दा तिच्यासोबत असून ते तिची भरपूर काळजी घेत आहेत. नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असणा-या सोनालीने फ्रेंडशीपडेच्या निमित्ताने नुकताच आणखी एक नवीन फोटो शेअर केला आहे. यात सोनालीने तिचे संपूर्ण केस कापून टाकल्याचे आपल्याला दिसून आले होते. तसंच तिच्यासोबत स्वदेस फेम अभिनेत्री गायत्री जोशी आणि ऋतिक रोशनची पत्नी सुझान खान दिसत होत्या. सोनाली आपल्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना पाहायला मिळाली.
सोनालीच्या या धैर्याला बॉलिवूडसोबतच तमाम चाहत्यांचा त्रिवार सलाम. ती लवकरच या कठीण प्रसंगून बाहेर पडेल.