सिनेसृष्टीत फार कमी अशा अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयानेसुध्दा रसिकांना तितकंच आकर्षित करतात. या अभिनेत्रींमध्ये मराठमोळ्या राधिका आपटेचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. मराठी असो वा बॉलिवूड, हॉलिवूड असो किंवा तमिळ, कन्नड, बंगाली प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाचा ‘लय भारी ठसा उमटवणा-या बोल्ड आणि बिनधास्त राधिकाचा आज 7 सपटेंबर हा वाढदिवस. तिचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. पण ती मूळची पुण्याची आहे.
सध्या गाजत असलेल्या लस्ट स्टोरी, सेक्रेड गेम्स आणि घूल या नेटफिल्क्सच्या बहुतांश सर्वच वेबसिरीजमध्ये राधिका झळकते आहे. म्हणूनच सोशल मिडीयावर तिला नेटिझन्सच्या ट्रोलचासुध्दा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये शोर इन द सिटी हंटर, मांझी, पॅडमॅन तर मराठीत लय भारी असे सुपरहिट सिनेमे राधिकाच्या नावावर आहेत.अक्षय कुमारसोबत पॅडमॅनमध्ये झळकल्यानंतर तर राधिकाचा भाव भलताच वधारला. तिच्याकडे आता अनेक सिनेमांच्या ऑफर्स आहेत. एक गुणी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. यशाची चव चाखण्यात आज राधिका मश्गूल आहे.
राधिकाने गणित आणि अर्थसास्त्रात पदवी घेतली आहे. पण सुरुवातीपासूनच तिचा कल अभिनयाकडेच होता. अभिनय हेच तिचं खरं पॅशन होतं. तिनं 8 वर्ष कथ्थकचं रितसर शिक्षण घेतलं आहे. राधिकाने 2012 साली ब्रिटीश संगीतकार बेन्डिक्ट टायलर सोबत लग्न केलं. सुरूवातीला तिनं आपलं लग्न लपवून ठेवलं होतं. परदेशात संगीत शिकायला गेल्यावर तिची आणि बेन्डिक्ट टायलर सोबत ओळख झाली होती व दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
सावळ्या रंगामुळे अनेकदा राधिकाला सिनेसृष्टीत अपमानसुध्दा सहन करावा लागला, तिला हिणवलं गेलं पण बिनधास्त राधिकाने त्याची कधी पर्वाच केली नाही. बोलणा-यांना बोलू दे आपण आपल्या कामगिरीने त्यांना चोख उत्तर देऊ हे नेहमीच राधिकाने ध्यानात ठेवलं आणि करुनही दाखवलं. पण तिच्या या यशोशिखरापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. तिला या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना कराव लागला.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका अभिनेत्याने सिनेमात काम देतो सांगून तिच्याकडे गैरवर्तवणूक करण्याची मागणी केली होती. तिने त्याला साफ नकार दिला. तर नंतर पुढे एकदा एका प्रसिध्द निर्मात्याने तिला फोन करुन सिनेमाची ऑफर तर दिली पण अभिनेत्यासोबत एक रात्र घालवण्याची अट ठेवली. तिने त्या निर्मात्याची तेव्हा चांगलीच कानउघडणी केली होती आणि ती ऑफर धुडकावून लावली. पण या प्रसंगानंतरही राधिका कधीच खचली नाही. आपल्या अभिनयावर नेहमीच ती प्रेम करत राहिली आणि आज अनेक अडथळे पार करत तिने आज प्रतिभावान अभिनेत्री म्हणून नाव कमावलं आहे. राधिकाच्या या अभिनय प्रवासाला पिंपीगमूनमराठीतर्फे सलाम!