हिंदीला मागे टाकत मुंबईतील बॉक्स ऑफीसवर सुरुय मराठी सिनेमांची घौडदौड
मराठी सिनेमा म्हटलं की पूर्वी नाकं मुरडली जायची व आम्ही हिंदी सिनेमाला जातोय असं ऐटीत सांगणं, हे प्रतिष्ठेचं मानलं यायचं. पण आता हे चित्र पूर्णपणे पालटलंय. प्रेक्षक आता मराठी सिनेमाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मराठी सिनेमांची चर्चा करु लागले आहेत.
घुसमट होत असलेल्या मराठी सिनेमाला 2004 साली ‘श्वास’ मिळाला व इथूनच सिनेसृष्टीत आलेली मरगळ झटकून निघाली. मग मराठी सिनेमांची गाडी सुसाटच सुटली. मराठीत नेहमीच आशयघन आणि दर्जेदार सिनेमे तयार होत आहेत. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हिंदी सिनेमांइतकी कमाई करणं जरा मराठी सिनेमाला कठीण जात होतं. पण तो भ्रमसुद्धा नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ने मोडीत घाडला.
मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकालासुद्धा ‘सैराट’ने तिकीटबारीवर खेचून आणले. 100 कोटींच्या क्लबमध्ये जाणा-या या पहिल्या मराठी सिनेमाने फक्त बक्कळ कमाईच नाही तर प्रेक्षकांसह अवघ्या बॉलिवूडला भुरळ पाडली. मराठीतील लोकप्रियतेचे अनेक उच्चांक या सिनेमाने मोडले. आर्ची-परशाची ही भाबडी प्रेमकथा हिंदीतसुध्दा रिमेक करण्यात आली.
मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाने तर सिध्दच केलं बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमाच उजवा ठरतोय ते. काशिनाथ घाणेकर सिनेमासोबतच यशराज फिल्म्सचा बिग बजेट आणि बिग बी अमिताभ बच्चन, आमिर खान असा मल्टी स्टारर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला खरा पण मराठी सिनेमासमोर तग धरु शकला नाही. तसंच या आठवड्यात नागराज मंजुळे यांची प्रथम निर्मिती असलेला ‘नाळ’ सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तितकाच भावतोय.
हिंदी सिनेमांना मागे टाकत मराठी सिनेमाने सर्वाअधिक स्क्रीन्स मिळवल्या आहेत. 'ठग्ज...'ला मुंबईत हजारहून अधिक स्क्रीन्स मिळाल्या होत्या, पण आता त्यांची संख्या दीडशेच्या आसपास आली आहे. दुसरीकडे '...काशिनाथ घाणेकर' सिनेमाच्या स्क्रीन मुंबईत १७७वरून ३००च्या घरात पोहोचल्या असल्याचे समजते आहे. 'नाळ' हा सिनेमाही ३००हून अधिक स्क्रीनमध्ये प्रदर्शित झाला होता. आज, त्याच्या स्क्रीनची संख्या ४००च्या घरात गेली आहे. त्यामुळे मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला मागे टाकल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
हे आनंदी आणि समाधानकारक चित्र पाहून अभिनेता सुबोध भावे म्हणतो, “भविष्यात मराठीत असे सिनेमे येत गेले तर नक्कीच हिंदी सिनेमांसमोर कोणतीही रडारड करावी लागणार नाही. अनेकजण चांगले सिनेमे द्यायच्या प्रयत्नात आहेत. मराठी सिनेमा मोठा आहे आणि तो अजून मोठा होईल. प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवेल.”