एखादा चित्रपट यशस्वी करण्यासाठी कलाकार जीवतोड मेहनत घेत असतात. त्यांच्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी हरप्रकारे काम करण्यास ते तयार असतात. याचे आताचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ कदम यांचा आगामी ‘नशीबवान’ चित्रपट. या चित्रपटामध्ये भाऊ सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका खरी वाटावी, म्हणून भाऊ यांनी चक्क कचरा उचलून साफसफाई केली आहे.
यात दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सफाई कामगार उचलतात तोच कचरा भाऊंना उचलण्यास सांगितले तसेच सार्वजनिक स्वछतागृहाची सफाई देखील करायला लावली. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे मुलुंड परिसरात झाले आहे. आपल्या भूमिकेविषयी भाऊ कदम म्हणाले, की या चित्रपटाच्या निमित्ताने मी सफाई कामगाराच्या समस्या अगदी जवळून पाहिल्या, त्यांना होणारे आजार, समाजाकडून त्याची होणारी हेटाळणी हे सर्व बघताना स्वतःचा तिरस्कार वाटायला लागला. कारण आपण निरोगी आरोग्य जगावे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा, यासाठी हे लोक घाणीमध्ये काम करतात,आपला कचरा उचलतात. खरंच खूप ग्रेट आहेत हे लोक. रात्रंदिवस झटणारे हे कामगार माझ्यासाठी खरे हिरो ठरले आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल शब्दांत व्यक्त होऊ न शकणारा असा आदर आता निर्माण झालाय.
'नशीबवान' हा चित्रपट उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असून, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, चित्रपटाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे आहेत. सोबतच प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी चित्रपटाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.