लॉकडाउनच्या या काळात घरात बसून काही जणं वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही काहीना काही नवीन गोष्टी घरात बसूनच करण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही सध्या वर्क फ्रॉम होम करतेय. ते कसं ? तर तिच्या नव्या पॉडकास्ट शोने
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवा पॉडकास्ट शो सुरु होत आहे. 'सोनाली सांगते ऐका' असं या शोचं नाव आहे. घरात बसून हे पॉडकास्ट रेकॉर्ड करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सोनालीचा हा प्रयत्न आहे. मात्र हा पॉडकास्ट शो सुरु करण्याआधी सोनालीने पॉडकास्टचं वर्कशॉपही केलं होतं. लॉकडाउनच्या आधीच केलेल्या या हबहॉपर एपच्या वर्कशॉपमध्ये सोनालीनेही सहभाग घेतला होता. या वर्कशॉपमध्ये सोनालीने तिचं पॉडकास्ट प्रेझेंट केलं होतं. यात सोनालीने रेकॉर्ड केलेल्या पॉडकास्टला दुसरा क्रमांक मिळाला होता. त्यानंतरच आता सोनालीचा नवा पॉडकास्ट शो हबहॉपर या एपवर ऐकायला मिळणार आहे. या पॉडकास्ट शोमधून तिच्या चाहत्यांना सोनालीविषयीच्या बऱ्याच गोष्टी ऐकायला आणि जाणून घ्यायला मिळतील तेही सोनालीच्याच आवाजात. या पॉडकास्ट शोमध्ये सोनालीच्या करियरचा प्रवास, कॉन्ट्रोवर्सी आणि महत्त्वाचं म्हणजे सोनालीच्या आयुष्यात आलेल्या नैराश्येविषयीही सोनाली या शोच्या पहिल्या भागात सांगेल. येत्या 17 एप्रिलपासून या पॉडकास्ट शोचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. हबहॉपर या एपवर हे पॉडकास्ट ऐकायला मिळेल. महत्त्वाचं म्हणजे या पॉडकास्ट शोचं कोणत्याही प्रकारचं स्क्रिप्ट नसेल. सोनालीच्या आयुष्यातील संघर्ष, करियरविषयीच्या गोष्टी, नैराश्य याविषयी सोनाली या पॉडकास्ट शोमध्ये बोलली आहे. याविषयीची माहिती सोनालीने तिच्या एका ऑडिओ क्लिप द्वारेच दिली आहे.
टेलिव्हिजन स्क्रिनवर,मोठ्या पडद्यावर तर कधी विविध कार्यक्रमांच्या मंचावर दिसणाऱ्या सोनालीला आता चाहते तिच्या आवाजाच्या माध्यमातून ऐकतील. तेव्हा हा अनुभव त्यांच्यासाठी आणि सोनालीसाठीही अविस्मरणीय असेल यात शंका नाही.