संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वेळोवेळी सरकारकडून नियम व सूचना देण्यात येत आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. घरात राहा, सुरक्षित राहा हे ब्रीद आपण सर्वांनी पाळणं अत्यावश्यक आहे. तरच करोना संकटापासून आपण वाचू शकतो.
आज सर्वच दैनंदिन कामं, व्यवहार ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. लॉकडाऊनमुळे आपल्याला अनेक गोष्टींना मुकावं लागत आहे. याचदरम्यान दिग्दर्शक रवी जाधव यांनी काळीज हेलावून टाकणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे ऐकून तुम्ही थोडे चिंताग्रस्त झाला असाल ना... साहजिकच आहे सध्या वातावरणच तसं आहे, आजुबाजूचं..पण तुम्ही चिंता करु नका...अहो, रवी जाधव यांनी वडा-पावचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो आधीपासूनच सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतोय.
मिश्कील अंदाजात रवी जाधव हा व्हिडीओ शेअर करत म्हणतात,'' मनाला चटका लावून जाणारा, काळीज चिरणारा अत्यंत ह्रदयद्रावक व्हीडीओ'
मुंबईची जान असलेला आणि कधीही कोणत्याही वेळी मुंबीकरांचं पोट भरणारा वडा-पाव सध्या लॉकडाऊनमुळे मिळणं दुरापास्त आहे. घरीच काय तो बनवू शकता, पण मुंबईच्या वडापावसारखी त्याला चव येणं दुर्मिळच. कधी कामाच्या गडबडीत, तर कधी कॉलेजला मित्रांसोबत वडा-पाव हाणण्याची मजा काही औरच.