सिनेसृष्टीत विविधांगी भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या चतुरस्त्र अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना सध्या एका मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. माहीम येथे राहणा-या नीना यांच्या सोसायटीतील मागच्या परिसरात गर्दुल्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत अनेकदा आवाज उठवून मुंबई पोलिसांना ट्विटरद्वारे याची वेळोवेळी माहिती दिली होती. पण याप्रकरणी अद्याप योग्य ती कारवाई झालेली नाही.
नीना यांच्या सोसायटी परिसरातील गर्दुल्यांच्या त्रास अनेक सामान्य नागरिकांना भोगावा लागतोय. याबाबत तक्रार करुनही अद्याप योग्य ती कारवाई किंवा तोडगा काढण्यात आलेला नाही. तर याउलट पोलिसांचं म्हणणं आहे, की त्यांनी या समस्येववर अनेकदा कारवाईचा बडगा उचललाय.
नीना कुलकर्णी आणि त्या वास्तव्यास असणा-या मकरंद सोसायटीतील रहिवाशी अनेक वर्षापासून येथील नागरिक आहेत. नीना यांच्यासह येथील सर्वच जबाबदार नागरिकांनी यापूर्वी ‘स्वच्छ माहिम किनारा’ या मोहिमेत सहभाग घेतला होता. माहिम समुद्रकिनारा या सोसायटीलगतच आहे.
मिड डे वृत्तपत्राशी बोलताना अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या, “मी या सोसायटीत गेल्या 50 वर्षांपासून राहते. ही खुपच शांत आणि छान कुटुंबवत्सल अशी सोसायटी आहे. पण मागील काही वर्षांपासून इथे गर्दुल्यांचा त्रास खुपच वाढला आहे. सोसायटीच्या मागच्या परिसरात प्रचंड सुळसुळाट सुरु असतो. ड्रग्सची देवाण-घेवाण होते. यांमुळे त्याचा सतत त्रास आमच्या सोसायटीतील रहिवाशांना होतोय. तसेच त्यांच्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ करण्यामुळे येथील लहान मुलांवर खुप वाईट परिणाम होत आहे.”
नीना कुलकर्णी पुढे म्हणाल्या, “मी आणि माझ्या मुलीने या गर्दुल्यांच्या त्रासाबदद्ल मुंबई पोलिसांकडे ट्विटरद्वारे तक्रार केली होती, परंतु फक्त आमची कारवाई सुरु आहे, तक्रार पुढे अधिका-यकडे पाठविली आहे, असंच उत्तर आम्हाला प्रत्येक वेळेस मिळालं. तसंच सोसायटीतर्फे लेखी तक्रारही करण्यात आली असून अद्याप यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.”
https://twitter.com/neenakulkarni/status/1077844087280230401
एकूणच नीना कुलकर्णी आणि त्यांच्या मकरंद सोसायटीतील रहिवाशी गर्दुल्यांच्या त्रासातून मुंबई पोलिस कधी एकदा सुटका करतात याच्या प्रतिक्षेत आहेत.