पु.ल देशपांडे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांचा जीवनपट उलगडणारा भाई हा सिनेमा आज 4 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा लेखक पु.ल देशपांडे यांच्यावरील सिनेमा पाहण्यासाठी तमाम प्रेक्षक अगदी आतुर झाले असतानाच त्यांची थोडी निराशा झाल्याचं समोर दिसून आहे. पु.लंच्या महाराष्ट्रात त्यांच्याच सिनेमाला स्क्रीन नं मिळण्याचं दुर्दैवी चित्र झळकत आहे.
चित्रपटाला मोक्याची थिएटर्स मिळत नसल्याने ‘भाई’ सिनेमाने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत परखड शब्दात आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात ४००० थिएटर्समध्ये सिंबा हा हिंदी चित्रपट सुरू आहे. त्यापैकी मोक्याची काही थिएटर्स मांजरेकर मागत असून, त्यांना वितरकाने याबाबत नकार दिला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसंच मुंबई-पुण्यातील मोठ्या थिएटर्सनीसुध्दा भाईला स्क्रीन्स नाकारल्याने सर्वत्रच नाराजीचा सूर उमटला आहे.
मुंबई व पुणे या दोन्ही शहरांमध्ये पु.लं यांनी छान ऋणानुबंध जपला होता. पण आता त्यांच्याच या दोन आवडत्या शहरात त्यांच्यावरील सिनेमाला एका हिंदी सिनेमासाठी स्क्रीन्स मिळणं कठीण झालं आहे. दक्षिण मुंबईतील १८, पश्चिम मुंबईत २० आणि नवी मुंबईतील ७ अशा एकूण ४५ चित्रपटातगृहात ‘भाई’चे शो आहेत हा आकडा ‘सिंबा’ला देण्यात येणाऱ्या स्क्रीनच्या तुलनेत खूपच कमी आहे.
महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक कलाकृती प्रदर्शित होत असताना त्याचं स्वागत करण्याऐवजी त्याला चक्क नाकारणं ही एक लज्जास्पद बाब आहे आणि म्हणूनच मला मी मराठी असल्याची लाज वाटते असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले. हा प्रश्न फक्त भाई सिनेमाचा नसून संपूर्ण मराठी सिनेमांचा आहे. याची दखल घ्यायला राज ठाकरे यांच्याव्यतिरिक्त एकही नेता पुढे आलेला नाही, असंही ते पुढे म्हणाले.
https://twitter.com/Viacom18Marathi/status/1081049910991036416