कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठुरायाचे पंढरपुरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन करता येणार नसल्याने विठ्ठलभक्तांच्या मनात खंत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पायी वारीसाठी बंधने घातली आहेत. या परिस्थितीत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने त्याच्या कवितेच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याला सध्याच्या परिस्थितीत ज्या रुपात पांडुरंग दिसला त्याविषयी त्याने सुंदर ओळी लिहील्या आहेत. या ओळी कानावर पडताच डोळ्यासमोर साक्षात पांडुरंग उभा राहिल्याचं जाणवतं. संकर्षणने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत विठुरायाची मुर्ती सोबत ठेवून तो या ओळी म्हणतोय. त्याने पोस्टमध्ये लिहीलय की, “पंढरीच्या विठूराया . . . . पहा .. नीट ऐका .. तुम्हालाही ह्या रुपात पांडुरंग दिसला असेल तर; नक्की कळवा.. रामकृष्ण हरी ..”
संकर्षण नेहमीच अप्रतिम लिहीतो. त्याच्या अभिनयाप्रमाणेच त्याच्या ओळी प्रभावित करतात. त्याच्या लेखणीतून तो एक नवं दृश्य निर्माण करतो. एवढच नाही तर त्याने लिहील्या ओळी त्याच्या तोंडून ऐकणं तेही सुंदर असतच. लॉकडाउनच्या काळातही त्याने अशाच विविध लिहीलेल्या कवितांचे व्हिडीओ केले आहेत.