लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. मात्र कलाकार मंडळींनी या काळात काहीना काही विविध उपक्रम घरात बसूनच केला. यातच ऑनलाईन माझं थिएटर या नव्या स्पर्धेचा उगम झाला. अभिनेता सुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेली ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली. आणि प्रेक्षकांनीही तिकीट काढून या ऑनलाईन स्पर्धेच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.
नुकताच या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पार पडला. आत्तापर्यंत या स्पर्धेत विविध कलाकारांच्या टीमने उत्तमो्त्तम परफॉर्मन्स सादर केले. मात्र महाअंतिम सोहळ्यात '२ फुल्या ३ बदाम' या संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले आहे. या संघाला 1 लाख रुपये रोख पारितोषिक मिळालं आहे. या संघात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, आरोह वेलणकर, गौरी नलावडे, ऋतुजा बागवे, मयुरी वाघ हे कलाकार आहेत. या कलाकारांनी या स्पर्धेत एकापेक्षा एक कलाकृती सादर केल्या. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात कलाकारांनीही घरात बसूनच घरात बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
याशिवाय अभिनेत्री हेमांगी कवी ही बेस्ट परफॉर्मर ऑफ द सिझन ठरली आहे. अभिनेता आरोह वेलणकरला एक्सपेरिमेंट ऑउट ऑफ द बॉक्स परफॉर्मर, अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला सर्वोत्कृष्ट लेखक, अभिनेत्री नेहा शितोळेला सर्वोत्कृष्ट लेखिका, अभिनेता सुनील अभ्यंकर यांना बेस्ट एन्टरटेनर ऑफ द सिझन, अभिनेत्री गौरी नलावडेला स्पेशल मेन्शन ज्युरी अवॉर्ड ही वैयक्तिक बक्षिसं या कलाकारांनी पटकावली आहेत.