By  
on  

EXCLUSIVE : महाराष्ट्राबाहेरील या ठिकाणी होणार या प्रसिद्ध मराठी मालिकांचे चित्रीकरण

महाराष्ट्रात सध्या येत्या 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी सुरु आहे. यातच इतर क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन विश्वातील कामही पुन्हा थांबलय. 2020 मध्ये उद्भवलेली तिच परिस्थिती आणि संकट मनोरंजन विश्वावर पुन्हा ओढवलयं. तर चित्रीकरण बंद असल्याने टेलिव्हीजनवर पुन्हा काही मालिकांचे, विविध कार्यक्रमांचे जुने भाग पाहायला मिळत आहेत. मात्र मनोरंजनात कुठेही खंड पडू नये यासाठी काही मराठी वाहिन्यांनी त्यांच्या मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्टार प्रवाह या वाहिनीवरही सध्या वैविध्यपूर्ण मालिका पाहायला मिळत आहेत. या वाहिनीवरील मालिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. शिवाय वाहिनीचा टीआरपी देखील सातत्याने अव्वल असल्याचं पाहायला मिळतय. यात प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु रहावं यासाठी या वाहिनीवरील काही मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करण्यात येत आहे. यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं चित्रीकरण गोव्यात होणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची टीमही चित्रीकरणासाठी गोव्यात स्थंलांतरीत होईल. तर ‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’, ‘सांग तू आहेस का’ या मालिकांचे चित्रीकरण सिलवासा येथे करण्यात येईल. या मालिकांचे कलाकार आणि इतर टीम ही येत्या काही दिवसांत ठरलेल्या ठिकाणी रवाना होणार आहे. तर नुकतच ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिकेची टीम गुजरातला रवाना झाली असून या मालिकेचं चित्रीकरण अहमदाबाद येथे सुरु करण्यात आलय.  

 

याविषयी स्टार प्रवाह मालिकेचे कॉन्टेन्ट आणि प्रोग्रॅमिंग हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत पिपींगमून मराठीने संवाद साधला. यावेळी त्यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. ते सांगतात की, “सध्या आम्ही मालिकांना कसं लवकरात लवकर ऑन एयर करु शकू याकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. आता मुंबईतील सेट्सप्रमाणे महाराष्ट्राबाहेर चित्रीत करत असलेल्या सेट्समध्ये सातत्य जपण्याचा प्रयत्न करू. शिवाय मालिकेतील सीन्समधील सातत्य जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करणार आहोत. मालिकांमधील जॉनर तसाच सुरु राहील.”
तर कोरोना संदर्भातील नियमांचे कसे पालन केले जाईल याविषयी ते सांगतात की, “ कोविडसंदर्भातील सगळ्या नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यात येणार आहेत. ज्या ज्या राज्यांमध्ये चित्रीकरणाची परवानगी आहे आणि जिथे चित्रीकरण होऊ शकतील तिथेच चित्रीकरण करणार आहोत. सगळ्या कलाकारांच्या कोविड चाचणी करूनच त्यांना महाराष्ट्राबाहेर नेण्यात येतय. ठरलेल्या नियमांप्रमाणे पुन्हा कोविड चाचणी करण्यात येईल. मालिकांचे नवे भाग कधी आणायचे यावर अजूनही चर्चा सुरु आहेत. लवकरच नवे भाग कधी येणार याची घोषणा ऑन एयरच करु.”

महाराष्ट्रात चित्रीकरण होत नसलं तरी विविध राज्यात त्या त्या मालिकेची टीम असल्याने कोणताच गोंधळ होणार नाही, शिवाय कोणत्याही कलाकाराला यासाठी जबरदस्ती केली जात नसल्याचही त्यांनी सांगीतली आहे.

यासह 'दख्खनचा राजा ज्योतिबा', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' आणि झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकांचे निर्माते आदिनाथ कोठारेने देखील याविषयी पिपींगमून मराठीशी संवाद साधला.
आदिनाथ सांगतो की, “कोरोना विषयीच्या सगळ्या नियमांचं पालन करून चित्रीकरण येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राबाहेर करण्यात येईल. चित्रीकरणाची ठिकाणे ही कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या रहायची सोय केलेल्या ठिकाणांपासून जवळ असणार आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचं पालन करत चित्रीकरण करण्यात येणार आहे.”


यासह इतरही मराठी वाहिन्या आणि मालिकांचे निर्माते महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे घरात बसलेल्या प्रेक्षकांना टेलिव्हिजनवरील त्यांच्या आवडत्या मालिकांच्या नव्या भागांचा आस्वाद घेता येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive