‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांसोबत कायम सोबत उभे असणारे आणि प्राणाची आहुती देणाऱ्या शिलेदारांची गाथा या मालिकेत पाहायला मिळतेय. याच मालिकेत अभिनेते अजिंक्य देव हे पराक्रमी लढवय्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत. याच निमित्ताने पिपींगमून मराठीने अजिंक्य देव यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय.
ज्यावेळी अजिंक्य यांना या भूमिकेसाठी विचारलं गेलं तेव्हा त्यांनी वडील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना याविषयी सांगितलं. अजिंक्य यांना वडिलांकडून जी प्रतिक्रिया मिळाली त्यानंतर ही भूमिका साकारण्याचा निर्णय अजिंक्य यांनी घेतला. या भूमिकेसाठी अजिंक्य यांनी खरंखुरं टक्कल केलय. याविषयी ते सांगतात की, “ मी केसांवर कात्री लावली आणि केस काढले. हा पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला एवढा मोठा लुकमधील बदल आहे. अगदी शेवटपर्यंत धास्ती वाटत होती. हेअरड्रेसर जेव्हा वस्तरा घेऊन माझ्या जवळ आला तेव्हा मी त्या बोललो की नको आपण काढुयात नको बारीक करुयात. कारण कुठेतरी ओळख नाहीशी होईल की काय असं वाटायला लागलं होतं. बाबांना मी याविषयी विचारलं की बाबा मी काय करू, तर त्यांनी विचार न करता थेट मला सांगितलं की, इतका मोठी रोल आहे आणि महाराष्ट्रात ही भूमिका इतकी मोठी आहे त्याच्यासाठी नुसतं केसांची आहुती देणं ही खूप छोटी गोष्ट आहे. त्यातून मला स्फुरण आलं आणि मी ही भूमिका करायचं ठरवलं. आता मला असं वाटतय की मी त्या भूमिकेची प्रतारणा केली नाही या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलाय आणि देतोय. बाबांचा इतिहासाचा अभ्यास खूप आहे आणि त्यांना इतिहासाविषयी खूप प्रेम आहे. म्हणूनच माझा सर्जा, वासुदेव बळवंत फडके यासारखे चित्रपट झाले. त्यांचं मत इतकं जोरदार होतं आणि मला सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी माझा लुक पाहिला आणि प्रोमो पाहिला तेव्हा ते म्हटले की अप्रतिम..”
या मालिकेचे विविध प्रोमो प्रदर्शित झाल्यावर अजिंक्य यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. याविषयी ते म्हणतात की, “ प्रेक्षकांना प्रोमो प्रचंड आवडलाय, तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्ध छान झालय. सोशल मिडीयावरही इतका प्रसिद्ध झालाय की त्याच्या प्रतिक्रिया मला अगदी जगाच्या वेगवेगळ्या टोकांवरुन आलाय. अमेरिका आणि इंग्लंडमधील काही मित्रांनी प्रतिक्रिया पाठवल्यात किंवा काही मेलसुद्धा आलेत की हे छान वाटतय. यात सर्वात मोठी साध्य करण्याची महत्त्वाची गोष्ट ही होती की बाजीप्रभू देशपांडे जे लोकांच्या मनात आहेत मी तसा दिसलो पाहिजे, ते कुठेतरी साध्य झालय असं मला वाटतय. प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळालाय त्याच्यावरुन सांगतोय की सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की ते बघीतल्यावर ते कोण आहेत हे विचारायची गरज नव्हती ते बाजीप्रभू देशपांडेच आहेच हेच लगेच जाणवतं. लोकांची उत्कंठा वाढलीय. माझी एन्ट्री कधी येईल असं विचारत आहेत. पण माझी एन्ट्री येईल तेव्हा येईल तुम्ही हा शो नक्की बघा हे मी सगळ्यांना सागतोय हे महत्त्वाचं आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो की, माझ्या आयुष्यात मला सर्जा करायला मिळाला, मला वासुदेव बळवंत फडके करायला मिळाले, त्यानंतर एका इंग्रजी सिनेमात मी तात्या टोपेंची भूमिका केली आणि आता बाजीप्रभू देशपांडे.
बाजीप्रभू देशपांडे साकारण्यासाठी जेव्हा अजिंक्य यांना विचारलं गेलं तेव्हा घाबरत त्यांनी नकार दिल्याचही ते सांगतात. “सुरुवातीला मी घाबरत नाही म्हटलो होतो. कारण मी बराच काळ टेलिव्हिजनवर आलो नव्हतो, शिवाय दररोज शूटिंग करायचं होतं. आधीच्या काही कमिटमेट्सही होत्या, व्याप मी तसाही आधीच वाढवुन घेतलेला होता. आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, शाळा आहे, शिवाय सामाजिक कार्यही मी करतो. त्यातून मी यासाठी कसा वेळ देऊ शकेल ही भिती होती. त्यानंतर इतकी मोठी भूमिका करायची ही खूप भाग्यशाली गोष्ट आहे. पण आपण त्यात पूर्णपणे उतरायला हवं. प्रोडक्शन आणि चॅनेलकडूनही विचारणा होत होती, शिवाय बाबांनी ही सांगितलं की तू हे कर, तेव्हा मी ठरवलं की आपण हे करूयात. मी योग्य निर्णय घेतलाय असं मला वाटतं."
पुढे ते सांगतात की, "तो पोषाख अंगावर चढवल्यानंतर, ती मिशी लावल्यानंतर, तो घेरा चढवल्यानंतर आपण इतिहासातच उतरल्यासारखं वाटतं. ते उभे राहिल्यानंतर लोकं घाबरायचे, एवढा ताकदीचा माणूस तो होता. कुठेतरी आपण खरोखर इतिहासात गेल्याची भावना निर्माण येते. शिवाय काम करताना सगळं नैसर्गिक वाटतं.”
बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्या तर होतेच शिवाय त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे होते. पावखिंडीतील लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला होता. शिवाजीराजे विशाळगडाकडे पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला त्यांनी खिंडीत रोखून ठेवले होते. याच बाजीप्रभू देशपांडे यांच्या लढाई सीन करण्यासाठी अजिंक्य देव उत्सुक असल्याचं सांगतात. “लवकरच पावनखिंडीचं चित्रीकरण होणार आहे, ज्यात एक दोन लढाया दाखवण्यात येतील. जेव्हा महत्त्वाचा लढाईचा सीन असेल त्यासाठी मोठा सेट लावण्यात येणार आहे. मी त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा मी खरोखर त्या पावनखिंडीत उतरुन ती लढाई करेल.”