रोहित शेट्टीच्या सिंबा या पोलिसपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आणि वर्षअखेर हा ब्लॉकबस्टर सिनेमा देऊन निरोप दिला. आता रोहित पुन्हा एकदा आपल्या आगामी पोलिसपटाच्या तयारीला लागला आहे. ह्यात बॉलिवुड खिलाडी अक्षय कुमार नायक साकारतोय. मह्त्त्वाचं म्हणजे या सिनेमात त्याची नायिका म्हणून अभिनेत्री पूजा हेगडे हिच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
परंतु पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अद्याप सूर्यंवंशीच्या कास्टबाबत रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारने अद्याप कुठलाच निर्णय अथवा बातचितच केलेली नाही. अक्षय कुमारकडे सध्या दोन प्रोजेक्ट्स आहेत. त्यापैकी एक आर. बाल्की यांचा मिशन मंगल आणि करण जोहरचा गुड न्यूज. त्यामुळे हे सिनेमे पूर्ण झाल्याशिवाय त्याच्याकडे वेळ नाहीए. जवळपास एप्रिलनंतर सूर्यवंशीच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. म्हणूनच सिनेमाची नायिका निवडण्यासाठी अद्याप त्यांच्याकडे बराच वेळ आहे.
रोहित शेट्टीच्या आगामी सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमारची नायिका पूजा हेगडे साकारणार याबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या. ही खरं तर सोशल मिडीया किंवा या अभिनेत्रीच्या पीआर एजन्सीची स्ट्रॅटजी असू शकते. ज्यामुळे तिचं नाव सारखं चर्चेत राहिल आणि निर्माते-दिग्दर्शक इतर प्रोजेक्टसाठी तिचा विचार करु शकतील. पण खरं तर असं काहीच होत नाही, उलट अशा उगीचच वावड्या उठवल्याने निर्माते-दिग्दर्शक नाराजच होतात.