‘काहे दिया परदेस’ या मालिकेने काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मराठी मुलगी व अमराठी मुलाची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खुप भावली. २०१६साली प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील शिव व गौरी ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अभिनेता ऋषी सक्सेना व मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव यांनी प्रेक्षकांच्या हदयावर राज्य केलं.
‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘रेनबो’ या चित्रपटांतून ऋषी मोठ्या पडद्यावर झळकला. आता ऋषी सक्सेना हिंदी कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
कलर्स वाहिनीवरील ‘सावी की सवारी’ या मालिकेतून ऋषी हिंदी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत असून मानव हे पात्र साकारताना दिसणार आहे. ऋषीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मालिकेचा प्रोमो व्हिडीओ शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याच्या पोस्टवर चाहते व सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.