कोणत्याही बायोपिकचा युएसपी असतो तो त्यातील कलाकारांची निवड. बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रोहन यांनी यापूर्वी ३ इडियट्स, व्हेंटिलेटर, सचिन ; अ बिलियन ड्रीम्स या सिनेमांसाठी कास्टींग डायरेक्टरची जबाबदारी पार पाडली आहे. या सिनेमाच्या कास्टींगच्या अनुभवाविषयी आणि मराठीमध्ये रुजत चाललेल्या कास्टींगच्या या ट्रेंड विषयी अधिक जाणून घेण्यासाठी रोहन मापुस्कर यांच्याशी पीपिंगमूनने केलेली ही बातचीत.
सर्वासाधारण सिनेमापेक्षा बायोपिकसाठी कास्टींग करताना कोणता अनुभव आला? ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडली?
ठाकरे हा सिनेमा माझ्या आयुष्यातील पहिलाच बायोपिक आहे ज्याचं कास्टींग मी करतोय. त्यामुळे मला या निवडीसाठी खुप अभ्यास करावा लागला. खुपसे संदर्भ तपासावे लागले. बाळासाहेबांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या घटनांचा अंदाज घ्यावा लागला. त्यावर अनेक चर्चा झाल्या, स्केचेस बनवले गेले. त्यावरून ठरवलं गेलं की कोणता माणूस कोणत्या व्यक्तिरेखेला साजेसा राहील. या कास्टींगसाठी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील कलाकारांचा विचार केला गेला होता. अनेक प्रथितयश नावंही या व्यक्तिरेखांसाठी चर्चेत होती. पण त्यांचीही लूक टेस्ट घेतल्यावरच योग्य व्यक्तीची निवड केली गेली.
एखादा कलाकार अमुक एका व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे हे कसं ठरवलं जातं?
प्रत्येक व्यक्तिरेखेचे काही ठोकताळे असतात. उदाहरणार्थ, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमात सुबोध भावे यांनी साकारलेली भूमिका पाहा. यात सुबोध डॉ. घाणेकरांच्या लूकशी खुपच समरस झाला. अर्थात सुबोध आणि डॉक्टर या दोन भिन्न व्यक्ती असल्याने काही फरक असणं सहाजिक होतं. पण हा फरक सुबोधच्या अदाकारीमध्ये लपला गेला. बायोपिकमध्ये काम करताना संबंधित व्यक्तिरेखेच्या मिस मॅच जागा कलाकाराने अभिनयाने भरून काढायच्या असतात तर मिस मॅच जागा कमीत कमी असतील असा कलाकार शोधणं हे आर्ट डायरेक्टरचं काम असतं. ठाकरेमध्येही नवाजच्या रुपाने ठाकरेसाहेबांच्या एकुणच बॉडी लॅग्वेजशी साधर्म्य असणारा कलाकार मिळाल. नवाजचं चालणं, काही हावभाव हे थेट साहेबांची आठवण करुन देणारे होते. त्यामुळेच नवाज साहेबांच्या व्यक्तिरेखेत चपखल बसला. नवाजनेही साहेबांच्या बॉडी लॅग्वेजचा अभ्यास केला. भाषणं ऐकली आणि मग अभिनय सादर केला.
मीनाताई ठाकरे, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिरेखेसाठी कलाकार निवडीची प्रक्रिया कशी होती?
खरं तर राज आणि उद्धव यांच्या व्यक्तिरेखेविषयी ठोस असं काही ठरवलं गेलं नव्हतं. पण दिग्ददर्शकांनी सांगितल्यानुसार मी या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य असणारी व्यक्ती शोधत होतो. ही शोधमोहीम बरीच अवघड होती. पण या सिनेमाचं कास्टींग हातात घेतल्यानंतर असावेत म्हणून मी या दोघांच्या व्यक्तिरेखांचा रिसर्च सुरु ठेवला होता. आयत्या वेळचा गोंधळ टाळण्यासाठी केलेली ही युक्ती बरीच कामाला आली. त्यानंतर निवड केली ती मांसाहेबांची. खरं तर मांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेतल्यावर मला एकच शब्द आठवला तो म्हणजे सोज्वळ. या व्यक्तिरेखेसाठी मी अशा अभिनेत्रीच्या शोधात होतो जिच्या चेह-यावर निरागस आणि सात्विक भाव असतील. मग मेक अप केलेला असो वा नसो. त्यामुळे या चेह-यासाठी मला राजश्री प्रॉडक्शनच्या सिनेमांची मदत झाली. कारण त्यांचे सिनेमे कौंटुंबिक असल्यामुळे पात्रांभोवती सात्विकतेचं वलय आपोआप दिसून यायचं. त्यावेळी मी अमृताचा विवाह हा सिनेमा बघत होतो. त्यातील तिचा अभिनय, हावभाव पाहूनच मी मांसाहेबांच्या भूमिकेसाठी अमृताची निवड केली. विशेष म्हणजे अमृता वैयक्तिक आयुष्यातही एक चांगली व्यक्ती आहे. मुख्य म्हणजे अमृता खुप दिवसांनी पडद्यावर दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल यात शंका नाही.
ठाकरेच्या कास्टींगची प्रोसेस साधारण किती दिवसांची होती? प्रत्येक सिनेमाच्या कास्टींगला लागणारा कालावधी सारखाच असतो का?
ठाकरे सिनेमाच्या कास्टींगला जवळपास साडेतीन ते चार महिन्यांचा वेळ लागला. कारण या सिनेमात अनेक व्यक्तिरेखा आहेत. आनंद दिघे, दत्ता साळवी या आणि अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. या सिनेमासाठी जवळपास ७० ते ८० चेहरे मॅच करावे लागले. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेक व्यक्तिरेखांसाठी मॅच शोधावे लागले. या सिनेमात आनंद दिघेंची व्यक्तिरेखा माझ्या मित्रांच्या काकांनी केली आहे. म्हणजेच काही चेहरे आसपास होते तर काही जाणीवपूर्वक शोधावे लागले. गजानन किर्तीकर यांच्या व्यक्तिरेखेचंही तसंच झालं. माझ्या बाबांच्या आणि किर्तीकरांच्या चेहे-यात असलेलं साम्य लक्षात आलं आणि माझे किराणा दुकानदार बाबा सिनेमात काम करायला तयार झाले. त्यामुळे या सिनेमात केवळ नावाजलेले अभिनेतेच नाही तर काही सामान्य माणसांमधील अभिनेतेही आहेत. कास्टींगचा कालावधी प्रत्येक सिनेमासाठी वेगळा असतो. व्हेंटिलेटर सिनेमासाठी मला जवळपास एक वर्षाचा कालवधी लागला होता.