By  
on  

PeepingMoon Exclusive: 'टिक्या' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय हीच माझ्या कामाची पोचपावती : प्रथमेश शिवलकर

'ती परत आलीये'... ह्या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. हॉरर-थ्रीलर जॉनरची ही मराठी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेचं दमदार कथानक ह्या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. निर्जन रिसॉर्टवर रियुनियनसाठी आलेला नऊ दोस्तांचा ग्रुपमधली प्रत्येक व्यक्तिरेखा बोलकी ठरतेय, यापैकीच सतत घाबरणारा-पळपुट्या असा टिक्या आपल्या हटके शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतोय. शिक्षक टीकारामची भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता प्रथमेश शिवलकरसोबत पिपींगमूनमराठीने केलेली ही खास बातचित. 

 

अभिनय क्षेत्रातल्या तुझ्या प्रवासाबद्दल सांग? 

-    मी मुळचा मुंबईचाच आहे. पण वडिलांची कामानिमित्त रत्नागिरीला बदली झाली. त्यामुळे माझं कॉलेजचं शिक्षण तिथेच झालं. मी रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये शिकलोय. तिथे मी विविध नाटकांमधून कामं केली आहे. तसंच मी मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागासाठी राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नाटकांमध्ये सक्रीय सहभागी होतो. असंच कामं करता करता मुंबईच्या एका ग्रुपसोबत मी एक प्रायोगिक नाटक केलं होतं, त्यातली माझी भूमिका पाहून मला 'अंजली' या मालिकेसाठी पहिला कमर्शिअल ब्रेक मिळाला. यात मी साकारलेली ग्लुकोजची विनोदी भूमिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या एका सीझनचा विजेता ठरलो. मग 'सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेममद्ये'सुध्दा काम केलं आणि आता करोनाच्या दुस-या लाटेनंतर 'ती परत आलीय'साठी ऑडीशन दिलं आणि टिक्याची भूमिका पदरात पडली. 

 

 

संघर्षकाळात कुटुंबाचा पाठिंबा मिळाला का?

-    घरात खरं तर सर्वच सरकारी सेवेत आहेत, मीच एकटा अभिनयाच्या वेडाने झपाटलोय. आई-बाबा, माझा भाऊ आणि माझी एक चुलत बहिण आहे पूजा या सर्वांनी मला या मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड प्रोत्साहन दिलं आहे. बहिण पूजा तर मला सतत प्रोत्साहित करते, नाही तू हे कर , तू करुच शकतोस, तुला यश नक्कीच मिळणार आता अजिबातच मागे फिरायचं नाही, असं तिचं सतत म्हणणं असतं. या सर्वांच्याच पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत पोहचलोय.


 

'ती परत आलीय'मधली 'टिक्या' ही भूमिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय काय सांगशील?

मालिकेतला टिक्या खुलवण्यामध्ये आमच्या लेखक-दिग्दर्शकाचा खुप मोठा वाटा आहे. त्यांनीच माझ्यातला तो टिकाराम बाहेर आणलाय. त्याची सर्व पार्श्वभूमी पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिलीय. हे पात्रं साकारताना मी पण खुप एन्जॉय करतोय, अक्षरश: जगतोय. हातात सुरा  घेऊन  चाललेला टिकाराम प्रेक्षकांना आवडतोय, त्याच्या प्रत्येक हालचाली लक्षात घेतल्या जातायत, या प्रतिक्रीयांमुळेच तो आणखी खुलवण्यासाठी माझी जबाबदारी वाढलीय. 


 

मालिकेत टिकाराम जितका घाबरट पळपुट्या स्वभावाचा आहे, पण तु ख-या आयुष्यात कसा आहे?

-    मालिकेतला टीकाराम हा पेशाने शिक्षक आहे, तरीसुध्दा प्रचंड भीतीच्या छायेखाली वावरत असतो. खुप भित्रा आहे. काहीही घडलं तर लगेच त्या परिस्थितीतून पलायन कसं करता येईल याच्या शोधात तो असतो. पण ख-या आयुष्यातला प्रथमेश मात्र अगदी वेगळा आहे. जी परिस्थिती असेल त्याला मी तोंड देतो, त्यातून मार्ग कसा काढता येईल हे पाहतो. सोबतच्या सर्वांना साथ देतो. मदतीसाठी पुढाकार घेतो. दोघंही अगदी भिन्न आहोत.

 

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्यासोबतचं  काम करण्याचा अनुभव कसा आहे? 
-    काम करता करता विजय सर आमच्यातलेच कधी होऊन गेले तेच कळलं नाही. ते आमच्या मालिकेच्या सेटवरचे सर्वात तरुण कलाकार आहेत. त्यांच्यात ठासून एनर्जी भरलीय. इतक्या मोठ्या ज्येष्ठ कलाकारासोबत आम्हाला काम करायला मिळतंय, हेच आमचं भाग्य आहे. त्यांच्याकडून खुप शिकायला मिळतं. त्यांचे सीन्स  तर पहातच रहावेसे वाटतात. ऑफस्करीन आमच्यासोबत ते खुप धम्माल करतात. 

 

तुम्ही एकूण नऊ जणं आहात तर तुमच्या सर्वांचं ट्युनिंग कसं आहे ? 
-    आमच्या सर्वांचं एकमेकांशी जबरदस्त  ट्युनिंग  आहे. सर्वच एकाच वयोगटातले असल्याने  पटकन मैत्रीसुध्दा झाली. तसं श्रेयस राजे आणि समीर खांडेकर ह्या दोघांना मी नाटकांमुळे पूर्वीपासून ओळखत होतो, पण इतरांना या सेटवरच पहिल्यांदा भेटलो. प्रथम असं वाटलं होतं की, नऊ जणं आहोत तर आमच्यातलं गिव एन्ड टेक कसं होईल, काही कुरबुरी होतील का, पण उलट सर्वच समरसून काम करतोय. एकमेकांना साथ देतोय, त्यामुळे काम करता करता सर्वच पर्सनल, प्रोफेशनल लाईफबद्दल एकमेकांशी शेअर करु लागले  आणि नकळतच एक छान बॉंड आमच्यात तयार झालाय. त्याचीच छबी ऑनस्क्रीनसुध्दा उमटते. 

 

मालिकेची हॉरर थीम असल्याने अनेक सीन्स रात्री होतात, तुम्हाला भीती वाटते का किंवा तसा अनुभव आला आहे का?

-    कर्जतमध्ये कलोदे नावाचं एक गाव आहे. तिथल्या एका रिसॉर्टमध्ये आमच्या मालिकेचं शूटींग सुरु आहे. रात्रीचं सूटींग असलं तरी संपूर्ण युनिट सोबत असतं त्यामुळे तशी भीती वाटत नाही. पण एक वेगळाच किस्सा नक्कीच सांगेन. मालिकेच्या सुरुवातीच्या भागांमध्येच आमच्यातला एक मित्र अभयचा खून होतो, त्यावेळी आम्ही सर्वच हादरुन जातो. पार्टी सुरु असतानाच अचानक कोणीतरी पाठीत सुरा खुपसल्याने तो अचानक आमच्या सोमर टेबलवर येऊन आडवा कोसळतो, हे तुम्ही पाहिलं असेलच. एखाद्या नाटकाच्या तालमीसारखा हा सीन आम्ही आधी परफॉर्म केला. अभय साकारणारा अभेनता आलोक बेलवलकर प्रत्येकाच्या क्लोजशॉटसाठी तसाच पालथा पडून होता, तेव्हा खुप भयंकर फींलिंग आलं. आमच्यातलंच कोणीतरी गेलंय असं वाटलं. ते आठवून अजूनही काटा येतो. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive