सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे. गणपतीचे हे दहा दिवस भक्तीमय आनंद आणि हर्षोल्हास घेऊन प्रत्येकाला सुखावून टाकतायत. बाप्पाच्या सेवेत सर्वच तल्लीन झाले आहेत. म्हणूनच पिपींगमूनच्या सेलिब्रिटी बाप्पा या विशेष सदरात अभिनेता प्रथमेश परबसह केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचित
गणपती बाप्पा आणि तुझं नातं कसं आहे
- माझं नावचं प्रथमेश आहे. त्यामुळे आता वेगळं नातं काय सांगू, यातच सर्व आलं.आमच्या घरी गणपती बसवत नसले तरी चाळीतले शेजारचे सर्व गणपती म्हणजे आपलेच गणपती असतात. गणेशोत्सवात बाप्पाच्या आराधनेत तल्लिन होणं, मोदकांवर ताव मारणं, सर्वांनी एकत्र जमून धम्माल करणं हे आहेच. पण कुठलीही गोष्ट मनात असेल ती किंवा काही इच्छा असेल तर ती सर्वात आधी बाप्पासमोर डोळे मिटून सांगणं यासारखा दुसरा आनंद नाही.
गावच्या गणेशोत्सवाबद्दल काय सांगशील का?
- मी मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे कोकणातल्या गणेशोत्सवाची मजाच काही और असते. गणपतीसाठी गावी जाणं यासारखं दुसरं सुख नाही. मी खास सुट्टी काढून, कधी कधी तर शूटींग रद्द करुनसुध्दा गणपतीसाठी गावी गेलोय, आत्तासुध्दा मी आगामी सिनेमाचं शूटींग करतोय, पण गणपतीसाठी मी चार दिवसांची रजा आवर्जून काढलीय.
गावी खुप धम्माल असते. प्रत्येकाच्या घरी गणेशोत्सवात दरदिवशी भजनाचा कार्यक्रम असतो, मग त्यानंतर खाण्याची चंगळ असते. जर मिसळ पाव असेल तर मग कोणी किती पाव खाल्ले यावर आम्हा मुलांमध्ये चढाओढ रंगते.
गणेशोत्सवातली एखादी खास आठवण?
जसं मी म्हटलं, की मी गावी कोकणात गणेशोत्सवात खुप मजा करतो. तसंच गणेशोत्सवातली एक हदयस्पर्शी आठवण आहे. टाईमपास सिनेमानंतरच्या गणेशोत्सवात मी जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा गावक-यांनी माझा सत्कार केला होता. हा सत्कार माझ्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा नक्कीच मोठा आहे, कारण आपल्या माणसांनी केलेला तो सत्कार होता. आधी गावात माझ्या बाबांमुळे लोक मला ओळखत होते, पण आता माझ्यामुळे बाबांना लोक ओळखायला लागले, हे मला तेव्हा कळलं, ही खुपच खास अशी आठवण आहे.
तुला आरत्या म्हणता येतात का?
- हो ब-यापैकी सर्व आरत्या मला येतात. ज्या येतात त्या प्रामाणिकपणे म्हणतो, ज्या येत नाहीत त्या म्हणतच नाही फक्त टाळ्या वाजवतो. आरतीचा ताल धरुन जे मध्ये जोरदार स्वर लावतात. त्या जोरजोरात उंचावणा-या पोरांपैकी मी एक आहे, गणेशोत्सातले हे दिवस भारावून टाकणारे आहेत.
गणेशोत्सव मिरवणुकीत कधी नाचलायस का?
- अर्थातच हो. आमच्या विभागातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात आम्ही खुप धम्माल करायचो. आता कोविडमुळे बाप्पाची ती धमाकेदार मिरवणूक, तो जल्लोष, बेभान होऊन नाचणं हे सर्वकाही मिस करतोय. मला डिजेच्या तालावर गणपती डान्स करायला खुप आवडतं. ते ट्रॅफिकमध्ये दोरी सांभाळून नाचताना मुद्दामून ती पार करुन थिरकण्यात माझा नेहमी पहिला नंबर असायचा.
बाप्पाकडे यंदा काय मागणार?
- पहिली गोष्ट जर कुठली मागायची असेल बाप्पाकडे तर मी हे मागेन की लवकरात लवकर हे कोविड संकट टळू दे आणि थिएटर्स सुरु होऊ दे. फक्त माझेच सिनेमे नाही तर अनेकांची कामं यामुळे रखडली आहेत. तेव्हा लवकरात लवकर मनोरंजन क्षेत्र सुरळीत होऊ दे अशी मी बाप्पाकडे प्रार्थना करणार आहे.