रितेश देशमुख या नावाला हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. सिनेक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना रितेशने इथे स्वत:ची ओळख बनवली आहे. रितेशचा सध्या टोट्ल धमाल रसिकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. त्यानिमित्ताने रितेशने पीपिंगमूनशी केलेली खास बातचीत :
पहिला सिनेमापासून ‘टोटल धमाल’ पर्यंतच्या प्रवासाकडे पाहून काय वाटतं?
मला सिनेमाची पार्श्वभूमी नसल्याने जे काही शिकलो ते सेटवरच शिकलो आहे. विनोदाचं टायमिंग, संवादशैली हे मी सेट्वरच शिकलो आहे. अनेक अभिनेत्यांना पहात त्यांच्या अभिनयातील बारकावे, त्यांचं सादरीकरण याचा अभ्यास करून माझ्यातील अभिनेता घडला आहे. २००७ मधील धमालमध्ये आणि आताच्या धमालमध्ये खुप फरक आहे आणि या कालावधीमध्ये अभिनेता म्हणून माझ्यातही बदल झाला आहे. पहिल्या धमाल आणि आतामध्ये ११ वर्षांचा फरक आहे. त्यामुळे अनेक गोष्टींमधील बदल अपरिहार्य आहे.
अभिनय केला नसतास तर कशात करीअर केलं असतं?
या क्षेत्रात येण्याआधी मी आर्किटेक्चर होतो. पण मध्यंतरी सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने मी पूर्णवेळ या कामाला देऊ शकत नाही. पण मी अजूनही रिकामा वेळ मिळाला की या कामात रमतो. मी आणि काही मित्रांनी मिळून सुरु केलेली फर्म आहे. त्यात मी काम करत असतो.
तुला आतापर्यंत कोणती व्यक्तिरेखा साकारताना दडपण आलं होतं?
मला ‘एक व्हिलन’ सिनेमातील व्हिलनची व्यक्तिरेखा साकारताना टेन्शन आलं होतं. कारण त्यापूर्वीच्या सिनेमांनी माझी इमेज विनोदी कलाकाराची बनवली होती. त्यामुळे व्हिलन साकारणं माझ्यासाठी खरं आव्हान होतं.
जिनिलियावहिनीसोबत सिनेमाचे काही प्लॅन्स आहेत का?
लोक मला आणि जिनिलियाला एकत्र काम करण्याविषयी अनेकजण विचारत असतात. आम्ही लवकरच एकत्र येऊ. खरं तर तिच्यासोबत मला मराठी सिनेमा करायला खुप आवडेल.