By  
on  

PeepingMoon Exclusive: ललित प्रभाकर म्हणतो, 'ती' गोवा ट्रीप मी कधीच विसरु शकत नाही

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर ‘चि. व चि. सौ. का.’, ‘हंपी’ या चित्रपटांमध्ये झळकला. तर आनंदी गोपाळ सिनेमातील गोपाळरावांची सशक्त भूमिका साकारुन त्याने मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या या कणखर भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. यासाठी त्याला सर्वौत्कृष्ट अभिनेता म्हणूव फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलं. 
 

लवकरच  झोंबिवली, टर्री, कलरफुल, मिडीयम स्पायसी असे ललितचे अनेक वेगळ्या धाटणीचे  सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण तत्पूर्वी तो एका हटके भूमिकेतून आणि  मैत्रीपूर्ण  कथानकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 


 

मित्र-मैत्रिणींच्या प्रत्येक ग्रुपचं गोवा ट्रीप हे एक स्वप्न असतं. खुपदा ही गोवा ट्रीप प्लॅन केली जाते आणि अचानक तो प्लॅन कॅन्सलही होतो. तुमच्या-आमच्या प्रत्येकाचे गोवा ट्रीपचे काही-ना काही हटके किस्से नक्कीच असतील. त्याच किस्स्यांची , किंबुहुना तुमच्या जमून आलेल्या गोवा ट्रीपची आठवण करुन देणारी सर्व  धम्माल 'शांतीत क्रांती' या नव्या को-या वेबसिरीजमध्ये अनुभवता येणार आहे. तीन मित्रांची ही गोष्ट आहे. या वेबसिरीजमध्ये ललित प्रसन्न या मध्यवर्ती भूमिकेत आहे. या वेबसिरीजनिमित्ताने प्रसिध्द अभिनेता ललित प्रभाकरने पिपींगमून मराठीसोबत केलेली ही एक्सक्ल्युझिव्ह  बातचित. 

 

'शांतीत क्रांतीती’ल तुझ्या भूमिकेबद्दल सांग?

-     प्रसन्न ही भूमिका खट्ट्याळ, मिश्कील पण तितक्याच समजूतदार तरुणाची आहे. महत्त्वाचं म्हणजे तो एक स्टेट लेव्हलचा स्विमर आहे. पण ख-या आयुष्यात मला अजिबात पोहता येत नाही, मी 10 दिवस पोहण्याचा प्रामाणिक सराव  केला तोसुध्दा शास्त्रशुध्द पध्दतीने. पण त्यात मी काही तरबेज झालो अशातला भाग नक्कीच नाही. पण जी गोष्ट मला येत नाही ते करण्याचं चॅलेंज मला या भूमिकेमुळे स्विकारता आलं, याचा खुप आनंद आहे. ही माझी पहिलीच वेबसिरीज, त्यामुळे मी यासाठी खुपच उत्साही आहे. 

 

 

तीन मित्रांच्या ’शांतीत क्रांती’ची भन्नाट गोष्ट प्रेक्षकांना पाहताना नेमकं काय अनुभवयाला मिळेल?

 
मी, आलोक राजवाडे आणि अभय महाजन आम्ही तिघांनी मिळून खुप धम्माल केलीय. आमचं एक छान बॉंडींग तुम्हाला यात दिसेल. मैत्री ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक खास गोष्ट असते. ती तुम्ही कमावलेली असते. आजच्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्या मित्रांना जाणून घेणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं फार दुर्मिळ झालंय, इच्छा असूनही आपण त्यांना भेटू शकत नाही. ही तीन मित्रांची गोष्ट आहे. ते त्यांच्या आयुष्यातल्या चढ-उतारांना कसे सामोरे जातात, मित्रच मित्रांना कसे डावलतात, मग पुन्हा कसे एकत्र घट्ट होतात. हे पाहायला मिळेल. त्यामुळे ही वेबसिरीज पाहून तुम्हाला तुमच्या जुन्या मित्रांची नक्कीच आठवण येईल. तुमचीच गोष्ट वाटेल. पुन्हा तुमच्या नेहमीच्या मैफिली रंगवाव्याश्या वाटतील.  मित्र आणि गोवा हे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेलं रिफ्रेशिंग कथानक पाहिल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल, याची मला खात्री आहे. 

 

 

दिग्दर्शक सारंग साठ्येसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

-    सारंग खुप समजुतदार दिग्दर्शक आहे, असं मी म्हणेन. त्याची सीन्स समजावून सांगण्याची पध्दत खुपच अफलातून आहे. प्रत्येक गोष्ट तो समजून-उमजून करतो. सेटवरती ती एनर्जी, तो मैत्रीचा झोन सारंगच अलगद तयार करायचा. संपूर्ण टीमला एकत्र घेऊन तो काम करतो. शूटींग करताना तो आमचा दिग्दर्शक कमी आणि आमच्यातला मित्रच जास्त होता त्यामुळे काम करताना खुप मजा आली. 

 

ख-या आयुष्यातल्या तुझ्या गोवा ट्रिपचा एखादा अविस्मरणीय असा किस्सा सांगू शकतोस का?

हो तो किस्सा अविस्मरणीयच आहे. मी एकदा नाटकाच्या प्रयोगाला गोव्याला गेला होतो. तर मी आणि माझ्या मित्राने ठरवलं आता इथे आलोच आहोत तर गोवा फिरायचंच. ते पावसाळ्याचे दिवस होते, भरपूर पाऊस कोसळत होता. तरीसुध्दा फिरायचंच हा निश्चय आम्ही केला होता.  आम्ही एक बाईक रेंटवर घेतली होती. पाऊस  प्रचंड  कोसळत होता. पण त्या भर पावसातही आम्ही संपूर्ण गोवा पालथं घातलं. सर्व समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळं पावसामुळे ओस पडली होती. तरीही आम्ही जीवाचं गोवा केलं.नएक एक क्षण जगलो.  तो मुसळधार पाऊस आमची गोवा ट्रीप कॅन्सल करु शकला नाही. ही ट्रीप मी कधीच विसरु शकत नाही. 

 

 

तु तुझ्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केलीस, पुन्हा कधी छोट्या पडद्याकडे वळणार का?

-    तसं सांगायचं झालं तर त्यासाठी वेळ आणि संधी दोन्हीही लागतील. सध्या तरी माझ्या आगामी सिनेमांच्या कमिट्मेंट्स पाहता माझ्याकडे तितका वेळ नाही. त्यामुळे सध्या तरी असा कुठलाच विचार नाही. 

 

हिंदी सिनेविश्वात काम करण्याचा विचार आहे  का?
-    हो का नाही. तिथे खुप चांगली आणि हुशार माणसं आहेत. खरं तर  ते मला एक्स्प्लोअर करायचंच आहे. एखादी चांगली ऑफर चांगलं काम जर मला मिळालं तर नक्कीच ते मी स्विकारेन. 

 

 

आत्तापर्यंत अशी कुठली भूमिका किंवा अमूक प्रकारचं काम करण्याचं तुझ्या बकेट लिस्टमध्ये आहे?
-    असं एक नाही सांगता येणार. मला ब-याच गोष्टी करायच्या आहेत. एक चांगली एक्शन फिल्म मला करायचीय. सस्पेन्स-थ्रीलर, हॉरर जॉनर असे विविध पठडीतले सिनेमे करायचे आहेत. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive