By  
on  

PeepingMoon Exclusive: जातीव्यव्सथेवर सिनेमे करण्याची आज गरज भासते, हीच आपली शोकांतिका - रिंकू राजगुरु

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. आपल्या पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. सैराटनंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. 

अशाच जातीव्यवस्थेवर भाष्य करणा-या एक्शन-थ्रीलर 200-हल्ला हो या हिंदी सिनेमामध्ये रिंकू राजगुरु एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. या निमित्ताने रिंकूने पिपींगमून मराठीसोबत केलेली ही एक्सक्ल्युझिव्ह बातचित 

'जाती के बारे में क्यू नं बोलू सर....' , अशा दमदार संवादातून तू या लक्ष वेधून घेतेय, जातीव्यवस्थेवर भाष्य करणा-या सिनेमामध्ये काम करणं किती आव्हानात्मक होतं?

-    मला अशा भूमिका साकारण्यात विशेष आव्हानात्मक असं काही वाटत नाही. उलट मला वाटतं की अशा प्रकारचे म्हणजेच जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे सिनेमे करणं आणखी गरजेचं आहे. काळाची गरज आहे. तरच समाजात बदल घडेल. तर दुसरीकडे असंही वाटतं की याप्रकारचे सिनेम करण्याची गरज पडणं ही आपली व आपल्या समाजाची शोकांतिकाच आहे. आज काळ खुप बदलला आहे. सर्वच जण पुढारले आहेत पण आपले विचार मात्र अजून मागासलेलेच आहेत. सिनेमाध्यमातून  जात-पात, स्त्री-पुरुष यांवर सतत भाष्य करावं लागतंय याचं खरं तर वाईट वाटतं. 
 

200-हल्ला हो सिनेमामधील तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल?

-    या सिनेमात मी आशा सुर्वे नावाच्या मुलीची भूमिका करतेय. ही एक दलित कुटुंबातली मुलगी आहे. त्या समाजात वावरणारी मुलगी आहे. पण ती खुप सुशिक्षित आहे. तिला शिक्षणाची खुप ओढ आहे. ती हॉटेल मॅनेजमेंट करत असते. पण जेव्हा ती शिक्षण संपवून आपल्या गावी येते, तेव्हा तिला तिथलं भयाण वास्तव अस्वस्थ करतं. दिवसा ढवळ्या रस्त्यातच दलित समाजातील मुलींवर, स्त्रियांवर  अत्याचार केले जातात, पण या विरोधात मात्र कोणी काहीच आवाज उठवत नाहीत. आशाला हे काहीच सहन होत नाही ती या विरोधात आवाजात उठवण्याचं ठरवते. पेटून उठते. तिला पाहून इतर मुलींना –स्त्रियांनासुध्दा बळ मिळतं व त्यासुध्दा अन्यायाविरोधात लढतात. मग एकत्र मिळून 200 स्त्रिया या अन्यायाविरोधात कसा लढा देतात, हे तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल. आशाची छान लव्हस्टोरीसुध्दायात पाहायला मिळेल. हिंदी अभिनेते बरुण सोबती यांच्यासोबत माझी केमिस्ट्री तुम्ही पाहू शकता. 

 

 

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत तु स्किन शेअर  केली आहेस,  याबद्दल काय सांगशील?

-    ही खुप मोठी गोष्ट आहे की, अमोल पालेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. सुरुवातीला मला त्यांच्याशी बोलायचं धाडसच होत नव्हतं. फार दडपण आलं होतं आणि मग अमोल सरांनीच ते हेरलं व ते स्वत:हून माझ्याशी बोलायला आले. तेव्हा कुठे मी मोकळेपणाने त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारु लागले. मग तेसुध्दा आम्हाला त्यांच्या काळातल्या गोष्टी, तेव्हा कसं शूटींग असायचं. कसं काम केलं जायचं याचे अनुभव सांगयाचे. अमोल सर  आम्हा सर्वांनाच सीन्स करताना बारीक-सारीक गोष्टी छान समजावून सांगायचे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यापेक्षा त्यांच्याकडून खुप शिकायला मिळालं याचा आनंद जास्त आहे. मला त्यांचा बातों बातों में हा सिनेमा खुप आवडतो. 

 

 

200-हल्ला हो सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावा असं तुला वाटतं ? 

-    हा सिनेमा नसून ती एक प्रेरणा आहे असं मला वाटतं . सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधरित आहे.  स्त्रियांचा अन्यायाविरोधातला लढा आहे. 200 स्त्रियांनी एकत्र येऊन लढा दिलाय तो नक्कीच कौतुकास्पद आहे. जात-पात, लिंग-भेद विसरुन सर्वांनी एकत्र गुण्या गोविंदाने राहण्याचा संदेश हा सिनेमा देतो. एक मोलाची शिकवणच यातून मिळतेय. आजच्या पिढीच्या प्रत्येकानेच तो पहावा असं मला वाटतं. 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive