सध्या कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाउन सुरु होऊन बरेच दिवस झाले आहेत. यातच घरी बसून या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न बहुतांश लोक करत आहेत. कला विश्वातील कलाकार या मिळालेल्या वेळेत घरात बसून नव नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणी दर दिवशी काही विषयी घेऊन व्हिडीओ करतात तर काही कविता वाचनाचे व्हिडीओ करतात. यातर मराठी रंगभूमीवर कलाकारांनी एक नवीन कल्पना सुचवली आहे.
'कोरोना थिएटर' असं या कल्पनेचं नाव आहे. नाटकवेड्या युगंधर देशपांडेची ही संकल्पना आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर कोरोना थिएटर असं नवं अकाउंट उघडण्यात आलय. या पेजवर दररोज एक व्हिडीओ पोस्ट करण्यात येतो. एखादा मोनोलॉग, कविता, नाटकातील भाग या व्हिडीओत परफॉर्म करण्यात येतो. कारण ‘थिएटर थांबू शकत नाही’ असं ब्रीदवाक्य या पेजवर लिहीलय. या पेजच्या माध्यमातून थिएटर प्रेमींना घरबसल्या या सगळ्या गोष्टी या ऑनलाईन थिएटरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अभिनेता सिध्दार्थ बोडके, ललित प्रभाकर, अनिता दाते आणि चिन्मय केळकर, अंकुर वाढवे, गौरव घाटणेकर, मिलिंद फाटक हे आणि इतर बऱ्याच कलाकारांनी आत्तापर्यंत या पेजवर परफॉर्म केलय.
सध्या नाटक, नाट्यगृहेदेखील बंद आहेत त्यामुळे ही कला सादर करण्यासाठी कोरोना थिएटरचा उपक्रम राबवण्यात आलाय. जेणेकरुन नाट्यप्रेमींना या ऑनलाईन थिएटरच्या माध्यमातून ही कला पाहायला मिळेल. या उपक्रमाचं सोशल मिडीयावर सध्या कौतुक होताना दिसतय.