नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाबाबतचा मोठ्या निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दोन दिवसांचा विकएन्ड लॉकडाऊन लावला जात असून येत्या शनिवारी म्हणजेच 10 एप्रिल आणि रविवारी 11 एप्रिल कडक लॉकडाऊन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लादले गेले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्राच्या लॉकडाऊनविषयी घोषणा करण्यात आली आहे. यात आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध असून शनिवार-रविवार विकएन्डला कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू असेल असही सांगण्यात आलय. उद्या म्हणजेच 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून ही नियमावली लागू करण्यात येईल.
यात लोकल ट्रेन सेवा सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांनाही परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट मधील टेक अवे, होम डिलीवरी सर्व्हिस सुरु राहणार आहेत. जिम, सिनेमागृह, नाट्यगृह, गार्डन, मैदाने, शाळा, कॉलेज बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलय. तर धार्मिक स्थळांवरही निर्बंध असतील.
मनोरंजन विश्वातीलही काही नियमावली यावेळी सांगण्यात आली आहे. यात सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येने करता येणार नसल्याचं सांगण्यात आलं. चित्रपट शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे पण गर्दी, लढाई, आंदोलन अशा सीन्सच्या शुटींगला बंदी आहे.
रिक्षांमध्ये ड्रायव्हर आणि दोन लोक अशी परवानगी देण्यात आली आहे. तर बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल. कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरु करण्याच्या सूचना देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी व्हिजिटर्सना बंदी ठेवण्यात आली आहे. अंत्यविधींसाठी 20 लोकांनाच परवानगी देण्यात येईल. विमान प्रवासाबाबत अद्याप कोणतेही बदल करण्यात आले नाहीत, पण टेस्टिंग कडक करण्यात येणार. तर बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येने सोडलं जाईल.