मराठी चित्रपट आशयघनतेसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक मराठी सिनेमांतून हटके विषय निवडले जातात. मराठी प्रेक्षकही तितकाच चोखंदळ असल्यामुळे चित्रपटांतून प्रयोग केलेले बघायला मिळतात. समाजात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर नेहमीच चर्चा सुरु असतात. कोरोना महामारीच्या काळात त्या जास्त प्रमाणात रंगल्या कारण या आजारावर औषध म्हणजे देवावरची श्रद्धा असे अनेकांचे म्हणणे होते. याआधी गेल्या काही वर्षात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटण्याऱ्या काही लोकांवर सनातनी विचासरणीच्या लोकांनी प्राणघातक हल्लेही केलेत. अशाच प्रकारच्या विषयावर आधारित एक मराठी चित्रपट बनलाय ज्याचं नाव आहे ‘मला उडत येतं’.
‘मला उडत येतं’ हा चित्रपट एक उपहासात्मक डार्क-कॉमेडी असेल आणि कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर भाष्य करणारा असेल. कोरोनामुळे ‘मला उडत येतं’ या चित्रपटाचं चित्रण अर्ध्यावर अडकलं होत. परंतु शासनाकडून शूटिंगची परवानगी मिळाल्यावर या सिनेमाचं चित्रीकरण पुन्हा सुरु झालं आणि आता ते पूर्णही झालंय. परंतु त्याव्यतिरिक्त चित्रपटाचा तपशील प्रकाशित करण्यात आला नाहीये. तसेच सध्या प्रचलित असलेल्या प्रथेप्रमाणे निर्मात्यांनी कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली असून प्रेक्षकांना लवकरच त्याबद्दल कळेल.
वास्तविकतेला धरून चालणाऱ्या ‘मला उडत येतं’ या चित्रपटाची कथा एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर बेतली आहे. गरिबीत राहणाऱ्या त्याची बायको कटकट करीत असते, मुलगा सतत आजारी पडत असतो, मुलीवर बडेजावाचा प्रभाव पडलेला असतो आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी लटपटी खटपटी करणारा मेव्हणा असतो. या सर्वांमुळे त्याचे आयुष्य निरस झालेले असते. अचानक एका अंधश्रद्धेमुळे असे काही घडते की त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.
मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘मला उडत येतं’ ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, चित्रपटगृहांत.