अभिनेते प्रसाद ओक यांच्या पत्नि मंजिरी ओक या एक व्यावसायिक आहेत. शिवाय त्या पती प्रसाद यांच्यासोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही काम करतात. अशात सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून त्या छोट्या उद्योजकांना मदत करताना दिसतात. यातून त्यांना या त्यांच्या निरपेक्ष हेतूचं फळ मिळालय.
चक्क एका नथीला मंजिरी ओक यांचं नाव मिळालय. ही नथ आता 'मंजिरी नथ' म्हणून ओळखली जाणार आहे. विविध साडी, दागदागिने यांच्या छोट्या उद्योगांना मंजिरी यांनी कोलॅबोरेशन मार्फत प्रोत्साहन दिलं. यातच एका नथीच्या ब्रँडला मंजिरी यांचं नाव मिळालं आहे. हा आनंद मंजिरी यांनी सोशल मिडीयावर शेयर केला आहे. शिवाय या सुंदर नथीतील त्यांचे फोटोही त्यासोबत जोडले आहेत.
मंजिरी या पोस्टमध्ये लिहीतात की, "छोट्या छोट्या उद्योजकांना माझ्याकडून छोटीशी मदत व्हावी या उद्देशानी मी "कोलॅबोरेशन" सुरु केलं. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय...आज एका "नथी" ला माझं नाव दिलं गेलंय "मंजिरी नथ".लोकांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मी प्रयत्न केले...करत राहीनच... पण आज माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान सुद्धा आहे... आणि तो तंतु यांच्यामुळे आलाय. तेव्हा स्वाती घोडके यांचे मनःपूर्वक आभार."
मंजिरी यांचे पती अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक यांना ही बातमी कळताच त्यांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून पत्निचे कौतुक केले आहे. प्रसाद ओक लिहीतात की, "प्रिय मंजू आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलंस.या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय...आज एका "नथी" ला तुझं नाव लागलंय. "मंजिरीनथ" आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली... तुझ्या सो कॉल्ड जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत...या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम"