By  
on  

'पावनखिंड' चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर

विविध ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास चित्रपटातून समोर आणला. त्यापैकीच इतिहासातल्या अतुलनीय पराक्रमाची परिसीमा म्हणजे पावनखिंडीचा रणसंग्राम. हा रणसंग्राम ते मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. चित्रपटाची झलक पाहिल्यापासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. याआधी हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर याचवर्षी 2022 मध्ये 21 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरलं होतं. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थीतीत आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 

येत्या 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीम यांनी सोशल मिडीयावर जाहीर केलय. यात म्हटलं गेलय की, "जय जिजाऊ ! जय शिवराय ! नमस्कार !
हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं कार्य आम्ही आपल्या चित्रपटांतून करत आलो आहोत आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने हे कार्य पुर्ढेही सुरु ठेवणारच आहोत. इतिहासातल्या अतुलनीय पराक्रमाची परिसीमा म्हणजे पावनखिंडीचा रणसंग्राम ! छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा हा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर सर्वांनी अनुभवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात. कोव्हीडमुळे उद्भवलेली ही परिस्थिती देखील तशीच आहे. या अपरिहार्य परिस्थितीमुळे आम्ही आमचा चित्रपट पावनखिंड आता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, दिनाक 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित करत आहोत. तुमची साथ आणि आशीर्वाद सोबत राहू द्या... हर हर महादेव !!!"

चित्रपटाची झलक टीझरद्वारे प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील विविध व्यक्तिरेखा आणि ते साकारणारे कलाकार यांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानूसार या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, रुची मोहन, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, माधवी नीमकर, सुरभी भावे, आस्ताद काळे,  शिवराज वायचळ आणि इतर कलाकार पाहायला मिळणार आहेत. पावनखिंड या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे दिग्पाल लांजेकर यांनी केले असून  तर अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive