ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा स्पष्टवक्तेपणा अनेकदा पाहायला मिळालाय. नुकतच त्यांनी केलेल एक विधान सध्या चर्चेत आलय. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत दुसऱ्या पुष्पात ते बोलत होते.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मालिकांचा घसरत चाललेल्या दर्जावरुन प्रेक्षकांना सल्ला दिला आहे. गोखले यांनी म्हटलं आहे की,"प्रेक्षकांनी स्वत:चा चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सिरीयल नक्की पहा." असे आवाहन विक्रम गोखले यांनी केलय.
रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत विक्रम गोखले यांनी प्रेक्षकाशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डिजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे. आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले. आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरीयल घाल पाणी, घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकाच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.