By  
on  

'झिम्मा' चित्रपटाची सिनेमागृहात पंच्याहत्तरी

लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवुडचेही अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. गेले अडीच महिने प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान 'झिम्मा'ने पटकावला आहे. आजही अनेक सिनेमे प्रदर्शित होत असताना ‘झिम्मा'ने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सोशल मिडीयावरही 'झिम्मा'च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे आणि आता बघता बघता या चित्रपटाने सिनेमागृहात 75 दिवस साजरे केले आहेत.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. एका दिवशी एकाच चित्रपटगृहात सलग अठरा खेळ हाऊसफुल्ल करण्याचा अनोखा विक्रम या चित्रपटाने केला. प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकणारा हा आशयघन चित्रपट तिसऱ्या आठवड्यात आधीपेक्षा जास्त शोज मिळवून सुपरडुपर हिट ठरला आहे. तर जगभरात 60 पेक्षा जास्त शहरांमध्ये प्रदर्शित झाला. झिम्माने आपल्या ५० व्या दिवशी महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये राहुन आपला गौरवशाली 50 दिवस साजरा करण्याचा रेकॉर्ड बनवला. कोविड काळात पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून 14.50 कोटींची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरीही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ॲमेझॉन प्राईम इंडियावर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये झळकण्याचा बहुमान या चित्रपटाने पटकावला आहे.या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाच्या लेखनाची धुरा इरावती कर्णिक यांनी सांभाळली असून संगीत अमितराज यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'झिम्मा' च्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो की, 'झिम्मा'ला प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून माझ्या मनात आज अनेक भावना आहेत. 'झिम्मा' प्रेक्षकांसाठी जशी रोलरकोस्टर राईड होती, तशी अनेक कारणांमुळे ती माझ्यासाठीही होती. मागील दोन वर्षांत अनेक वेळा प्रदर्शनाच्या तारखा बदलाव्या लागल्या होत्या, अनेक अडचणी आल्या तरीही बऱ्याच प्रतिक्षेनंतर सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून पंचाहत्तर दिवसांचा हा यशस्वी प्रवास तमाम प्रेक्षकांमुळेच शक्य झाला असे मी म्हणेन. रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार."

आता झिम्माचा दुसरा भाग येण्याचीही चर्चा रंगली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive