आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता दीदींना शासकीय इतामामात मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारही करण्यात आले. मोठ्या जड अंत:करणाने दीदींना चाहत्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचा सुरेल स्वर अजरामर राहील, हे मात्र नक्की.
लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.
लता मंगेशकर यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.