'कच्चा लिंबू', 'हिरकणी' असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता 'चंद्रमुखी' हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय.
टिझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ.पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना 'चंद्रमुखी'मध्ये पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील 'चंद्रमुखी'आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत असल्याच्या चर्चा आहेत.