मराठी चित्रपटसृष्टीसह प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी हिंदीतही नावलौकिक केलय. संगीताची उत्तम जाण असलेली ही जोडी सध्या इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमात परिक्षक म्हणून पाहायला मिळतात. नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे.
अजय - अतुल यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे आणि गर्व आहे. त्यामुळे हिंदीत काम करत असतानाही ते मराठीपण जपून आहेत. त्यामुळे हिंदीत काम करतानाही ते मराठी भाषेचा जास्तित जास्त वापर करतात. परंतु काही मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेही याविषयी बोलताना दिसले.
अतुल याविषयी म्हणतात की "काही मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात. मी नाव घेत नाही. पण सरळ क्या चल रहा है. कैसा है आज कल, असं त्यांचं सुरु होतं. तू काय हिंदीत बोलतोस बाबा, असा विचार आमच्या मनात येतो."
तर अजय म्हणतात की "मी आणि अतुल कुठेही गेलो तरीही मराठीतच बोलतो. निर्माता हिंदी असला, त्याला मराठी कळत नसली तरीही आम्ही मराठीतच बोलतो. गायकांसोबतही आम्ही मराठीत चर्चा करतो."