कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लॉकडाऊन या सगळ्या परिस्थितीचा फटका मनोरंजन विश्वालाही पडला होता. सध्या तशी परिस्थिती नसली तरी महाराष्ट्रात अद्याप 50 टक्के आसन क्षमतेनेच चित्रपटगृहे सुरु आहेत. असं असतानाही मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे झिम्मा.
झिम्मा या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद देऊन पसंतीची पावती दिलीय. एवढच नाही तर या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी 100 दिवस पूर्ण केले असून 15 व्या आठवड्यात पदार्पण केलय. बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाची ही गौरवास्पद कामगिरी पाहायला मिळालीय. या चित्रपटाने आत्तापर्यंत 15 कोटींची कमाई केली असून हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलाय.
लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा पहिलाच मोठा धाडसी मराठी चित्रपट आहे. एवढ्या विक्रमी संख्येने ‘झिम्मा’ची जोरदार घौडदौड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला असतानाही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ‘झिम्मा’या चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. ॲमेझॉन प्राईम वर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान ‘झिम्मा’ने पटकावला असून आजही झिम्मा सर्वत्र ट्रेंडींग ठरतोय.
या रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर निर्मात्या क्षिती जोग म्हणतात की, ‘’लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटांचे काय होणार, अशी नकारात्मक चर्चा सुरू असताना झिम्मा प्रदर्शित करण्याचे धाडस केले. आजही चित्रपटगृहांमध्ये ‘झिम्मा’ची यशस्वी घोडदौड सुरू असून शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्य बाब म्हणजे हा चित्रपट लॉकडाऊनच्या नंतर चित्रपटगृहांची दारे उघडणारा चित्रपट ठरला आहे. बॅालिवूड हॅालीवुडचे मोठे चित्रपट शर्यतीत असतानाही तीन महिन्यांहून आधिक काळ ‘झिम्मा’ने चित्रपटगृहांमध्ये टिकून राहणे नक्कीच अभिमानास्पद आहे. सोशल मिडीयावरही 'झिम्मा'च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे. त्याबद्दल माझ्या संपुर्ण टिमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत”.