दार उघड वहिनी म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली 18 वर्षे सन्मान करत आलाय. आता होम मिनिस्टरचं 'महामिनिस्टर' हे नवीन पर्व येत्या 11 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येतय. ज्यात बांदेकर भाऊजी विजेत्या वहिनींना चक्क 11 लाखांची पैठणी देणार आहेत.
महाराष्ट्रातच नाही तर भारतभर भ्रमंती करणारा हा महिलांसह संपूर्ण कुटुंबाचा आवडता कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रेक्षकांचं मनोरंजन तर करेलच मात्र सोबतच या कार्यक्रमातील विजेत्या वहिनींनी 11 लाखांची पैठणी देऊन त्यांचा सन्मान करणार आहे. त्यामुळे महिलामंडळाला देखील या कार्यक्रमाची उत्सुकता आहे.
या कार्यक्रमाची धुरा गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळणारे आदेश बांदेकर या कार्यक्रमाविषयी सांगतात की, "होम मिनिस्टर या कार्यक्रमाने 18 वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या १८ वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्ये देखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आहे.यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि ११ लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या पैठणीला सोन्याची जरी असेल पण ही 11 लाखांची पैठणी कशी असेल हि पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे, त्यामुळे महामिनिस्टर या नवीन पर्वासाठी मी देखील खूप उत्सुक आहे."
या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच समोर आलाय ज्यात आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्र त्यांची बॅग भरून देताना दिसत आहेत. यावर बांदेकर म्हणतात की, "सुचित्रा तिची कामं आणि शूटिंग सांभाळून मला प्रवासात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी तयार ठेवते. शूटिंगसाठी माझे सतत दौरे चालू असल्यामुळे मी खूप काळापासून माझ्या घरी २४ तास कधी घालवले असल्याचे मला आठवत नाहीत. त्यामुळे सुचित्रा मला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंकडे बारकाईने लक्ष ठेवते आणि ती जबाबदारी उत्तम सांभाळते असं मी म्हणेन."