'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' या चित्रपटानंतर आता लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'शेर शिवराज' हा चित्रपट येत्या 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. शिवराज अष्टक या त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित या भागांमधील हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटातून शिवरायांनी केलेला अफझलखानाचा खात्मा आणि त्याचा इतिहास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
'शेर शिवराज' या चित्रपटाच्या निमित्ताने नुकताच प्रतापगडावर प्रमोशन सोहळा पार पडला होता. यावेळी लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत चित्रपटातील काही कलाकार यावेळी उपस्थित होते. यावेळी ढोल - ताशाच्या गजरात या कलाकारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कलाकारांनीही यात सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशी प्रतापगडावर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी या चित्रपटाच्या टीमने पत्रकारांसोबत संवाद साधला. तर गड-किल्ले संवर्धनासाठी 'शेर शिवराज'च्या टीम कडून सह्याद्री प्रतिष्ठानला निधी अर्पण करण्यात आला. पावनखिंड चित्रपटाच्या यशानंतर त्या कमाईतील काही भाग या निधीतून देण्यात आलाय.