मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीत होणाऱ्या अजानावर नुकतच वक्तव्य केलं होतं. मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा; अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यातच या वादावर गायिका अनुराधा पौडवाल यांनी वक्तव्य केलय.
अनुराधा पौडवाल यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या वादावर वक्तव्य केलय. त्या म्हणतात की, "मी काही आखाती देशांत जाऊन आले. तिथं लाऊडस्पीकरवर बंदी असल्याचं पाहिलं. आपल्या इथं आता अजानप्रमाणे लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली तर हा वाद आणखी वाढणार आहे, हे पाहवत नाही"
अनुराधा पुढे म्हणतात की, "मी जगात अनेक ठिकाणी फिरलेय. पण आपल्या भारतात जे होतं, तसं घडताना मी इतर कुठेही पाहिलेलं नाही. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मात्र आपल्याकडे जबरदस्तीने या गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातं. मशिदीवर लाऊडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांना असं वाटतं की आम्हीसुद्धा असं का करु नये."
याआधी 2017 साली गायक सोनू निगमनेही अजानवर वक्तव्य केलं होतं. लाऊड स्पीकरवर मोठ्याने दिल्या जाणाऱ्या अजानवर सोनूने आक्षेप घेतला होता. त्यावर सोनू निगमने केलेले ट्विट चर्चेत आले होते. आता मुद्द्यावर पुन्हा चर्चा होऊ लागलीय.