‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी

By  
on  

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटातील गाण्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या चित्रपटातील चंद्रा गाणं तर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात गाजतय. यातच या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. आपल्या दिलखेचक अदांनी, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळतेय.

 यापर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. आता सवाल जवाबचा फड रंगला आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून त्याला अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. तर मधुरा दातार, प्रियांका  बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने रंगत आणली आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालतोय.

 चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक याविषयी सांगतात की,  ‘’या चित्रपटात आम्ही श्रृंगारीक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेल.’’ 

 

  प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.  

Recommended

Loading...
Share