वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. असाच वेगळा विचार घेऊन आलेला श्रीरंग देशमुख दिग्दर्शित ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. वेगळा विषय असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट प्रेक्षकांना पहाता येणार आहे.
आयुष्यातल्या एखाद्या महत्त्वाच्या वळणावर प्रत्येकाला ‘स्वत:चा असा एक निर्णय’ घ्यावा लागतो. हा निर्णय आयुष्याला वेगळं वळण देणारा असतो. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा ‘फक्त ‘तुमच्या मनाचाच’ कौल ऐका’ असं सांगू पाहणाऱ्या ‘एक निर्णय’ या चित्रपटामधून आजच्या काळाचे प्रतिबिंब दाखवण्यात आले आहे.
या चित्रपटात मांडलेले विचार आणि स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार याविषयीचा एक वेगळा पण महत्त्वपूर्ण दृष्टीकोन हा चित्रपट देत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर आवर्जून व्यक्त केल्या आहेत.
या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर -साटम, कुंजीका काळवींट, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत.