प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या 'वेडींगचा शिनमा' या सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर ते आता 'एकदा काय झालं' हा मल्टिस्टारर सिनेमा घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'एकदा काय झालं'च्या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच ते या सिनेमाला संगीतसुध्दा देत आहेत तर प्रसिध्द गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्यांचा मुलगा सिध्दार्थ महादेवन प्रथमच 'एकदा काय झालं'च्या निमित्ताने मराठीत गाणार आहे.
'भाग मिल्खा भाग' ह्या सुपरहिट बॉलिवुड चित्रपटामधील 'जिंदा' ह्या गाण्यासाठी सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्काराने गौरविण्यात आले. तो संगीत क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करतोय. लवकरच प्रदर्शित होणा-या मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिका पादुकोण स्टारर सिनेमा 'छपाक'चं गाणंसुध्दा त्याने गायलं आहे.
‘एकदा काय झालं’ या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त २६ डिसेंबर रोजी पुणे येथे सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटात महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित पार पडला. यावेळी या चित्रपटातील कलाकार सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये, रितेश ओहोळ, अर्जुन पुर्णपात्रे, अद्वैत वाकचौडे, अद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे उपस्थित होते. २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.