अलिकडे बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्ची जास्त चर्चा रंगताना पाहायला मिळते. या सर्वांमध्ये सैफ करिनाचा तैमूर आघाडीवर असतो. त्याच्या बाललीला टीपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीच अग्रेसर . तसंच शाहरुखचा लाडका अब्राम, करण जोहरची जुळी मुलं, सोहा अली खानची मुलगी, धोनीची मुलगी ही सर्वच बच्चेकंपनींची धम्माल टीपण्यासाठी फोटोग्राफर्स धडपडत असतात. त्यांची निरागसता रसिकांपर्यंत पोहचवायला त्यांना फार आवडतं.
रितेश-जेनेलिया देशमुख यांची दोन गोंडस मुलंसुध्दा इतर सेलिब्रिंटींच्या मुलांप्रमाणेच खट्ट्याळ आणि मस्तीखोर आहेत. त्यांच्यासोबतचे मस्तीचे अनेक व्हिडीओ त्यांचे आई-बाबा नेहमी सोशल मिडीयावरुन शेअर करतात आणि लगेचच त्यांच्या या गोड व्हिडीओवर चाहत्यांच्या पसंतीची पावतीही मिळते.
पण नुकतंच या मुलांनी आपल्या मातीतले संस्कार काय असतात, हे दाखवून दिलं. दोन-तीन दिवसांपूर्वी राहील आणि रियान हे दुपारी रितेश-जेनेलियासोबत मुंबईतील एका हॉटेलबाहेर स्पॉट झाले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सची फोटो घेण्यासाठी एकच धांदळ उडाली. पण या दोन्ही मुलांनी फोटोग्राफर्संना पाहताच हात जोडून नमस्कार केला. त्यामुळे त्यांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नातवंडं असलेल्या राहील व रियान यांचे आजी-आजोबांचे आणि मातीचे संस्कार सिध्द करुन दाखवले. त्यांच्या या व्हिडीओवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.