‘नाळ’ या मराठी सिनेमातील अभिनेत्री दीप्ती देवीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं आणि आगामी काळात आणखी सिनेमांमधून दीप्ती प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'शेवंती' या तिच्या लघुपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. याचं कारण म्हणजे निलेश कुंजीर दिग्दर्शित ‘शेवंती’ या लघुपटाची मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल(MIFF)मध्ये निवड झाली आहे. पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत या लघुपटाविषयी आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी दीप्तीने सांगीतलं.
या लघुपटाच्या निमित्ताने दीप्ती पहिल्यांदाच अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत झळकणार आहे. याविषयी आणि आदिनाथसोबतच्या अनुभवाविषयी दीप्ती म्हणते की, “आदिनाथ हा एक प्रामाणिक कलाकार आहे. त्याच्यासोबत काम करायला मला आवडलं. तो खुप चांगला मित्रही आहे, सिनेमाचं शुट कमी कालावधीत पूर्ण झालं आणि त्यात आदिनाथची कंपनी असल्याचा आनंद आहे. सिनेमाची विविध फेस्टिव्हलमध्ये निवड झाल्याने आपण केलेली मेहनत लोकांपर्यंत पोहोचणार आहे याचा आनंद जास्त असतो. फेस्टिव्हलमुळे सिनेमाला मोठा प्लॅटफॉर्म मिळतो आणि ओळखही मिळते.”
धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ या सिनेमातही दीप्ती झळकणार आहे. या सिनेमातही आदिनाथ कोठारे आहे. नुकतच या सिनेमाचही शुट पूर्ण झालं आहे. ‘पंचक’मध्ये माधुरीसोबत काम करण्याचा अनुभव दीप्तीने यावेळी शेयर केला. दीप्ती सांगते की,
“नाळ सिनेमाच्या निमित्ताने माधुरी यांची भेट झाली होती. त्या नाळ सिनेमा पाहायला आल्या होत्या तेव्हा पहिल्यांदा भेटले होते. नाळ सिनेमाविषयी गप्पा झाल्या होत्या. मी त्यांची मोठी चाहती आहे पण एक कलाकारासोबत कलेविषयी चर्चा करणं महत्त्वाचं होतं. नाळमुळे माधुरी यांनी मला नंतरही ओळखलं होतं. पंचक या त्यांच्या आगामी सिनेमासाठी मी ऑडिशन दिलं होतं आणि नंतर सिनेमाच्या टीमने मला या सिनेमात कास्ट करण्याचा निर्णय घेतला. या मोठ्या प्रोजेक्ट्मध्ये माझा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहे. ‘नाळ’नंतर येणाऱ्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रचंड उत्सुकता आहे.”