‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या सिनेमाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने विक्रम केलाच मात्र प्रेक्षकांचीही मनं जिंकली. लवकरच मराठीतही आणखी एक ऐतिहासिक सिनेमा येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचं आहे.
या सिनेमाचं चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. यावेळी पेडगावच्या लढाईतला सीन चित्रीत करण्याच आलाय. यावेळी पिपींगमून मराठीशी बोलताना प्रविण तरडे यांनी या सिनेमाचं आणि ‘तान्हाजी’ सिनेमाचं एक साम्य सांगीतलं. ते साम्य आहे या सिनेमातील घोडा. पूजा असं या घोड्याचं नाव असून तान्हाजी सिनेमातील अजय देवगणच्या तान्हाजी भूमिकेसाठी वापरलेला घोडा या सिनेमात असल्याचं त्यांनी सांगीतलं. सरसेनापती हंबीररावच्या भूमिकेसाठीही हाच घोडा वापरण्यात आला आहे. या सिनेमात प्रशिक्षण घेतलेले घोडेच युद्धाच्या सीन्ससाठी वापरण्यात आले आहेत. शिवाय युद्धाच्या सीन्ससाठी हिंदी सिनेमातील फाईट मास्टर्सचा वापर करण्यात आला आहे.
मराठीतही पुन्हा ऐतिहासिक सिनेमे येत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. त्यातच या सिनेमातून सरसेनापती हंबीरराव यांचा इतिहास पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे आणि लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.