By  
on  

अमिताभ बच्चन यांच्यात काहीच बदल झालेला नाही – विक्रम गोखले 

‘एबी आणि सिडी’  या सिनेमामुळे दोन दिग्गज कलाकार बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात बॉलिवुड शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेता विक्रम गोखले एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने बिग बी तब्बल 26 वर्षांनी मराठी सिनेमात दिसतील. याआधी विक्रम गोखले आणि बिग बी हे ‘खुदा गवाह’, ‘अग्निपथ’ या सिनेमांमध्ये एकत्र झळकले होते. 


या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता विक्रम गोखले यांनी पिपींगमून मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिग बींसोबतच्या त्यांच्या मैत्रीविषयी सांगीतलं. विक्रम गोखले म्हणतात की, “अमिताभ बच्चन यांच्यात काहीच बदल झालेला नाही. जे अनुभव मला त्यांच्यासोबत काम करताना पन्नास वर्षांपूर्वी आले तेच अनुभव तोच साधा, स्वच्छ, सरळ, छान, आणि अलाहदायक अनुभव ‘एबी आणि सिडी’ करताना आला. अमिताभ बच्चन यांना या सिनेमात घेण्याची माझी कल्पनाही नसून ही कल्पना लेखकाची आहे.”


शिवाय बिग बींसोबतची इतक्या वर्षांची मैत्री कशी जपून आहे याविषयीही विक्रम गोखले म्हटले. ते म्हणतात की, “आमचा एकमेकांशी संवाद हा सुरु असतो. प्रत्यक्ष बोलायला वेळ नसतो. पण आम्ही मेसेजद्वारे संपर्कात असतो. 15, 20 दिवसांनी किंवा महिन्याने आमचं बोलणं होत असतं.”


या सिनेमात दोन वयोवृद्ध मित्रांची कहाणी आहे. एक मित्र दुसऱ्या मित्राला पत्र लिहीतो हेही सिनेमाच्या पोस्टरवरुन समोर येतयं. मात्र मैत्री आणि पत्राचं नातं विक्रम गोखले यांच्या आयुष्यात कसं आहे याविषयी त्यांनी पिपींगमून मराठीशी संवाद साधताना सांगीतलं. विक्रम गोखले म्हणाले की, “20, 25 वर्षांपूर्वी पत्र लिहीण्याची मी स्व:ताला सवय लावून घेतली होती. येणाऱ्या प्रत्येक चाहत्याच्या पत्राला उत्तर देणारा म्हणून मी ख्यातकिर्त होतो. आता पत्र पाठवायला वेळ मिळत नाही. एक जवळचा मित्र होता त्याला पत्र पाठवायचो. असे अनेक मित्र मला मिळालेले होते जे माझे अत्यंत जवळचे मित्र होते त्यापैकी काही आहेत काही गेले. खूप जवळचा मित्र माझे वडिल होते, खूप जवळच्या मैत्रिणी माझी आई, आजी, सासू होती. आता सध्या खूप जवळची मैत्रिण माझी पत्नी आहे आणि माझ्या दोन्ही मुली आहेत.”


लवकरच ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले या सिनेमात एकत्र झळकणार असल्याचं सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. येत्या 13 मार्चला हा सिनेमा रिलीज होईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive