इतिहासातील सरसेनापती हंबीरराव यांचं योगदान ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन केलय. नुकतच या चित्रपटाचं चित्रीकरण पाचगणी येथे करण्यात आलं.
यावेळी पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रविण यांनी या सिनेमात ते साकारत असलेल्या भूमिकेविषयी सांगतीलं. या भूमिकेसाठी त्यांनी कशी तयारी केली याविषयी प्रविण म्हटले की, “या सिनेमातील माझ्या भूमिकेसाठी विशिष्ट शरीरयष्टी हवी होती. मी कोणती भूमिका करतोय हे लवकरच समोर येईल. मिस्टर इंडिया फेम महेश हगवणे पाटील यांनी माझ्या भूमिकेसाठी मला ट्रेनिंग दिलं आहे. शिवाय महेश यांची या सिनेमात महत्त्वाची भूमिकाही आहे.मला जे पाहिजे सिनेमात हे माझ्या मित्रांना चांगलं कळतं म्हणून माझ्या सिनेमात माझे मित्र असतात.”
या सिनेमातील इतर कलाकारांच्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेण्यात आली आहे.यावषियी या सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना काही अटीही घालून दिल्या होत्या. याविषयी प्रविण तरडे म्हटले की, “ज्या ज्या कलाकारांची शरीरय़ष्टी या सिनेमात उत्तम दिसेल त्याचं श्रेय महेश आणि श्रीपाद चव्हाण यांचं आहे. मागील 4 ते 6 महिने आम्ही सर्व कलाकारांनी काय खावं ?, डाएट काय असेल? याकडे लक्ष दिलं होतं. कोणत्या कलाकारांना घोडेस्वारी येते याविषयीचा अभ्यास सुरु होता. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला घोडेस्वारी येणं सक्तीचं होतं, व्यायाम करणं अनिवार्य होतं. फिटनेस नसेल तर यायचं नाही असही सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना सांगण्यात आलं होतं. ज्यांना कुणाला व्यसनं असतील त्यांनी या सिनेमासाठी व्यसनं बंद केली आहेत.”
सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव यांच्या भूमिका या सिनेमात कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.