निरागस चेहरा आणि हसरं व्यक्तिमत्व अशी ओळख असणारी मालिका आणि सिनेमा जगतातली अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे. वाढदिवस. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या दुहेरी व्यक्तिरेखा साकारणा-या श्रृतीचं सर्वत्र कौतुक झालं. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिध्द लेखक दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या बहुचर्चित आणि ऐतिहासिक सरसेनापती हंबीरराव सिनेमात ती शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या सोयराबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
या भूमिकेबद्दल खुद्द श्रृतीनेच सोशल मिडीयावरुन चाहत्यांसमोर खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवी राणी असण्याबरोबरच मराठ्यांचे वीर योध्दा सरसेनापती हंबीरराव यांच्या त्या मोठ्या भगिनी होत्या. आता सोयराबाईंच्या व्यक्तिरेखेत श्रृतीला पाहण्यासाठी सर्व उत्सुक झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या कार्यकाळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे.
संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये जगभरातील इतिहास अभ्यासक, शिवप्रेमी यांच्या भेटीला येणार आहे.