जगभर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, पण या आरोग्यावरील संकट परतण्याची सध्या तरी चिन्हं दिसत नाहीत. करोनाचा धसका मनोरंजनविश्वानेसुध्दा घेतला आहे. तुम्हाला माहितच असेल सिनेमा, मालिका, नाटकांचे प्रयोग व दौरे तसंच वेबशो या सर्वांचंच चित्रीकरण ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचं तुम्हाला माहितीच आहे. चित्रपट संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुटिंग व नाटकाच्या प्रयोगाच्या ठिकाणी काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना प्रवास करून कामाच्या ठिकाणी यावं लागतं. करोनाचा प्रभाव पाहता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतेय.
मुख्यत्वे नाटकाच्या बॅकस्टेजला काम करणारे आणि इतर तंत्रज्ञ मंडळी ही फक्त नाटकांच्या प्रयोगावरच अवलंबून असतात. त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण उदर्निर्वाह त्यावरच चालतो. पण आता नाटकांचे प्रयोगच होत नसल्याने त्यांचं घर कसं चालणार हा मोठा प्रश्न. पण त्यांच्या या कठीण परिस्थितीत त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे तो, प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांनी. त्यांनी सामाजिक भान जपत पडद्यामागील 23 जणांना काही ठराविक रकमेची मदत केल्याचं समजते. हे करोनाचं सावट कधी दूर होईल व कामाची घडी पुन्हा कधी नीट बसेल हे अजून सांगता येत नाही. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्यासोबत काम करणा-यांना माणुसकी म्हणून एवढं तर करुच शकतो, हे प्रशांत दामले यांनी दाखवून दिलं व ते नक्कीच कौतुकास्पद आहे.
संपूर्ण मनोरंजनविश्वातून प्रशांत दामले यांच्या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा होताना पाहायला मिळतेय. अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेसुध्दा याबाबत एक खास फेसबुक पोस्ट केली.
करोनामुळे अनेक नाटकांचे परदेश दौरेसुध्दा रद्द झाले. अश्रूंची झाली फुले, अमर फोटो स्टुडिओ आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या सर्वच नाटकांचे दौरे रद्द झाले आहेत.