अॅक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी आणि त्याचे अॅक्शनपॅक सिनेमे म्हणजे सुपरहिट समीकरण हे ठरलेलं. नानाविविध गाड्यांचे स्टंट, हाणामारी, ड्रामा, अॅक्शन आणि जोडीला लव्हस्टोरीची फोडणी असा पुरेपूर मसाला सिनेमा देणं व बॉक्स ऑफीसवर हिट करुन दाखवणं हे रोहित शेट्टीलाच जमतं. यात कुठलाच वाद नाही. पण हा रोहित शेट्टी आता मराठी सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय. काय सांगता..विश्वास बसत नाही ना... पण हे खरं आहे...अनेक बॉलिवूडकरांच्या पावलावर पाऊल ठेवत आता रोहितसुध्दा मराठी सिनेमाची निर्मिती करतोय.
अक्षय कुमार ,अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, संजय लीला भन्साळी, संजय दत्त यांच्यानंतर आता रोहित शेट्टीसुध्दा मराठीत पदार्पण करतोय. ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ असं त्याच्या सिनेमाचं नाव आहे.
रोहित शेट्टी निर्मित या पहिल्या मराठी सिनेमातून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश पदार्पण करतेय. तेजस्वी ही खतरों के खिलाडीच्या 10 व्या सीझनची स्पर्धक आहे. तसंच तेजस्वीने स्वरांगिनी, कर्णसंगिनी या प्रसिध्द मालिकांमधून तिने अभिनय साकारला आहे. तिनेच आपल्या इन्स्टाग्रामवरुन या सिनेमाची माहिती दिली. तसंच विहान सूर्यवंशी हा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. तर तिच्यासोबतच करण परब हा नवोदित अभिनेतासुध्दा या सिनेमाव्दारे पदार्पण करतोय.
तेजस्वी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते,"मला खुप अभिमान वाटतो आणि मी स्वताला भाग्यवान समजते की रोहित शेट्टींच्या पहिल्या मराठी सिनेमाद्वारे मला पदार्पण करण्याची संधी मिळतेय."
सर्वांनाच आता रोहित शेट्टीच्या या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.