आज करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातच काय तर महाराष्ट्रातही तो वा-याच्या वेगाने पसरतोय. त्याला थोपविण्यासाठी आपल्या सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. करोनाग्रस्तांची देशातली संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३० राज्यं लॉकडाउन करण्यात आली आहेत. व महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या करोनाचा धसका आता सर्वांनीच घेतलाय. पण नागरिकांमध्ये अजून याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. ते अजूनही ही बाब गांभिर्याने घेताना पाहायला मिळत नाही. याचा फटका मनोरंजनविश्वालासुध्दा बसला आहे. काही दिवसांपू्र्वीच गाण्यातून अनोखी जनजागृती करणारं पोस्टर प्रसिध्द शास्त्रीय गायक आणि संगीतकार महेश काळे यांनी चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. त्यानंतर आता घरी बसून कंटाळलेल्या चाहत्यांसाठी व संगीतप्रेमींसाठी एक अनोखी म्युझिक कॉन्सर्ट त्यांनी आयोजित केली होती.
महेश काळे यांनी चक्क फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही अनोखी म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करुन रसिकांपर्यंत पोहचवली. त्याला त्यांनी भरभरुन प्रतिसाद तर दिलाच पण मनमुराद आस्वादसुध्दा घेतला. अनेकांनी तर क्वारंन्टाईनच्या या काळात महेश दादा तुझं गाणं लाईव्ह ऐकायला मिळाल्याबद्दल महेश काळे यांचे आभारच मानले आहेत.