दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून छोट्या पडद्यावरुन घराघरांत पोहचलेली आणि नेहमी तोड-फोडची भाषा करणारी मीनल म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर. स्वानंदी अद्यापपर्यंत काही निवडक मालिका व नाटकांतूनच प्रेक्षकांसमोर आलीय. बाबा उदय टिकेकर यांच्याकडून अभिनयाचा तर आई आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याकडून गायनाचा वारसा स्वानंदीला लाभला आहे, व ती या दोहोंचा सुरेल संगम साधताना पाहायला मिळते.
सध्या सर्वच सेलिब्रिटी हा क्वारंटाईन वेगवेेगळ्या पध्दतीने व्यतीत करतायत. तसाच स्वानंदीसुध्दा या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग गाण्याच्या रियाजासाठी करतेय. तिने नुकतंच एक सुरेल असं बंगाली भजन गायलं. तोमाय पूजी मॉं... असं या भजनाचे शब्द असून स्वानंदीच्या स्वरांमधून तुम्हालासुध्दा ते भावतील. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने हे सुरेल भजनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनी त्यावर नेहमीप्रमाणे लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव केलाय.
स्वानंदीने उमेश कामतसोबत 'डोन्टवरी बी हॅप्पी' या लोकप्रिय नाटकाचे बरेच प्रयोग केले होते. तसंच ती झी युवावरील 'गुलमोहर' मालिकेतसुध्दा झळकली होती. पण आजही तिने साकारलेली बिनधास्त-बेधडक मीनल प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.